Tue, Feb 19, 2019 10:06होमपेज › Satara › कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अच्छे दिन

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना अच्छे दिन

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:00PMऔंध : वार्ताहर

मागील दोन वर्षे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणणार्‍या शेतकर्‍यांना यंदा मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी कांद्याचे दर अद्यापही चढेच राहिल्याने कांदा उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत. 
कांद्याचे दर काही वेळा शंभर ते दीडशे रूपये किलोच्या घरात गेले होते तर अनेक वेळा हे दर एक ते दोन रूपये किलोवरही  येऊन  थांबले होते. 

त्यामुळे काही वेळा ग्राहक खुशीत तर शेतकरी अडचणीत अशी स्थिती निर्माण झाली होती. मागील दोन वर्षे तर खटाव, माण या दुष्काळी पट्टयातील कांदा उत्पादक शेतकरी सततच्या पडलेल्या दरांमुळे हवालदिल झाला होता. अनेक ठिकाणी मोठी आंदोलने झाली तसेच शेतकर्‍यांचा कांदा सडून गेला. अनेकांनी हा कांदा शेतामध्ये पुरला तसेच फेकून दिला असेही प्रकार घडले आहेत.

कांदा हे पीक  जिरायती पट्टयातील आहे. त्यामुळे हे पीक उत्पादन शेतकर्‍यांसाठी  महत्त्वाचे मानले जाते. सततच्या पडत्या दरांमुळे अनेक शेतकर्‍यांनी अलिकडे कांद्याची लागवड कमी  केली आहे.सध्या रब्बी हंगामातील  कांदा बाजारात आला असून सुरूवातीला  पन्नास ते साठ रुपये  असणारे कांद्याचे दर आता तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दरावर स्थिरावले आहेत.

खटाव तालुक्यातील बुध, पुसेगाव, खटाव, औंध तसेच माण तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये सध्या उत्साहाचे  वातावरण आहे. सध्या सर्वत्र जोरात कांदाकाढणी सुरू आहे. हा कांदा कोल्हापूर, पुणे, मुंबई, कडेगाव, सांगली तसेच कर्नाटक, तमिळनाडू व अन्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला जात आहे. कायमस्वरूपी कांद्याला किमान तीन हजार रूपये क्विंटल आधारभूत किंमत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.