Sun, Sep 23, 2018 06:06होमपेज › Satara › कराड : विवाहितेचे 11 तोळे सोने लंपास

कराड : विवाहितेचे 11 तोळे सोने लंपास

Published On: Apr 20 2018 3:12PM | Last Updated: Apr 20 2018 3:12PMकराड : प्रतिनिधी 

रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आलेल्या सुरूल (ता. शिराळा) येथील विवाहितेचे घरातील कपाटात ठेवलेले 11 तोळे सोने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सुरूलच्या पल्लवी पाटणकर कुटुंबियांसह पुण्यात वास्तव्यास असतात. गुरूवार, 19 एप्रिलला त्यांच्या चुलत भावाचे लग्न शिराळा तालुक्यातील चिखली येथे होते. त्यामुळे पल्लवी पाटणकर या रेठरे बुद्रूक येथे आपल्या वडिलांच्या घरी आल्या होत्या. सोबत त्यांनी लग्नात घालण्यासाठी आठ तोळ्यांच्या बांगड्या व तीन तोळ्यांचा राणीहार असा सोन्याचा 11 तोळ्यांचा ऐवज आणला होता. बुधवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करण्यासाठी चुलत भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी घरात कोणीच नसल्याची संधी साधत कपाटात ठेवलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले.

हा प्रकार गुरूवारी लक्षात आला. मात्र लग्न असल्याने या प्रकाराची वाच्यता करण्यात आली नव्हती. लग्न समारंभाहून परतल्यानंतर गुरूवारी रात्री कराड तालुका पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 

Tags : Gold, Crime, Theft, Satara