Fri, Jul 19, 2019 20:27होमपेज › Satara › गोडोली नाका परिसर क्रिमिनल झोन 

गोडोली नाका परिसर क्रिमिनल झोन 

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 9:13PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्या धडाकेबाज कारवायामुळे गुन्हेगारी विश्‍वाला प्रचंड हादरे बसू लागले आहेत. असे असले तरी शहरातील काही भागांमध्ये असणारी गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेला स्वीकारावे लागत आहे. विशेषत: बॉम्बे रेस्टॉरंट, गोडोली नाका, विसावा नाका, मोळाचा ओढा या परिसरातील गुन्हेगारांचे अड्डे तापदायक ठरू लागले आहेत. गोडोली नाक्यावर खंडणीखोरांचा उच्छाद वाढला असून हा परिसरही क्रिमिनल झोन तयार होऊ लागला आहे. येथील टोळक्यांमुळे जनजीवन असुरक्षित असून व्यावसायिक भीतीच्या छायेत आहेत.  

सातारा शहर व उपनगरात नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये बॉम्बे रेस्टॉरंट, मोळाचा ओढा, विसावा नाका, गोडोली चौक, वाढे फाटा या परिसरात गुन्हेेगारी कारवायांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढू लागले आहे. गोडोली नाका परिसर दिवसेंदिवस असुरक्षित होऊ लागला आहे. बुधवारी रात्री खंडणीखोरांनी धुडगूस घातला. या घटनेने या परिसरातील गुन्हेगारी टोळक्यांची दहशत चव्हाट्यावर आली.  संबंधित टोळकं जणू काही सातारा आमच्या बापाचाच आहे, अशा अविर्भावात धुडगूस घालत होतं. या परिसरात होणारी ही राडेबाजी आता नवीन राहिलेली नाही. दररोजच कुठे ना कुठे छोट्या-मोठ्या गुन्हेगारी घटना घडतच आहेत. 

गोडोली नाका, सायन्स कॉलेजपासून  डीजी कॉलेज ते विसावा नाका, बॉम्बे रेस्टॉरंट या मार्गावर गुन्हेगारी घटनांचा उच्छाद  वाढला आहे. महाविद्यालयीन युवकांच्या भांडणांचे पर्यावसन हाणामार्‍यात होऊ लागले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयाबाहेरील टोळक्यांचा वावर या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथील शांतता व सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचे काम  टोळक्यांकडून होत असून त्याला ना महाविद्यालयीन व्यवस्थापनाचे, ना पोलिसांचे भय राहिले आहे. खुलेआम दादागिरी, मारामारी सुरू असून शांततेचे धिंडवडे काढले जात आहेत. गोडोली नाका  परिसरात राहणारी शांत व सोशिक जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. 

त्यांना जन्माची अद्दल घडवा

राडेबाजीबरोबरच इतर गुन्हेगारी घटनाही या परिसरात वाढू लागल्या आहेत.  त्यामुळे या परिसरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलिस यंत्रणा त्यावर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरत आहे. या परिसरात अधूनमधून पोलिसांच्या गाड्या फिरत असतात. मात्र, तेवढ्याने येथील क्राईमच्या घटना कमी होणार आहेत का? महाविद्यालय परिसरातील तसेच खंडणीसाठी खुलेआम दादागिरी करणार्‍या टोळक्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी पोलिसांना ठोस पावले उचलावी लागतील. 

 

Tags : satara, satara news, crime, Godoli Naka, Campus Criminal Zone,