Sun, May 26, 2019 01:43होमपेज › Satara › जागतिक महिलादिनी ‘अस्मिता’चा शुभारंभ

जागतिक महिलादिनी ‘अस्मिता’चा शुभारंभ

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:59AMसातारा : मीना शिंदे

मासिक पाळी आणि आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेने समाजात सर्वत्र सकारात्मक वातावरण तयार होत आहे. याचाच एक भाग म्हणून  राज्य सरकारकडून  स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणार्‍या ‘अस्मिता’ योजनेचा सातारा जिल्ह्यात 8 मार्च रोजी जागतिक महिलादिनी शुभारंभ करण्यात येणार आहे. महिला आरोग्याला प्राधान्य देणार्‍या या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिला दिनी आरोग्यदायी शुभेच्छा  मिळणार आहेत.

‘सॅनिटरी पॅड’चा वापर युवतींच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे सिद्ध झालेले असूनही चाळीस रुपयांपर्यंत किंमत असलेले हे पॅड घेणे बहुतांश कुटुंबांच्या आवाक्यात नसते. त्यामुळे अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना अवघ्या 5 रुपयांत व ग्रामीण भागातील महिलांना 24 ते 29  रुपयांमध्ये सॅनिटरी पॅड  उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘अस्मिता’ योजनेमुळे तळागाळातील युवतींपर्यंत मासिक पाळीदरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबद्दल जागृती होण्यास मदत होईल. मासिक पाळी विषयीच्या अंधश्रद्धा व जुन्या अनिष्ट रुढी परंपरेच्या कचाट्यातून किशोरवयीन मुलींना मुक्त करण्याची गरज आहे. या नैसर्गिक प्रक्रियेच्या आरोग्यदायी व्यवस्थापनापासून मुलींना थांबविले जाते. मुलींमध्ये लज्जेची भावना व संकोच निर्माण होऊन मुलींचे खच्चीकरण होते. मासिक पाळी ही महिला व मुलींच्या आरोग्य व जीवनशक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा  आहे.  त्यामुळे मासिक पाळीच्या कालावधीत सॅनिटरी पॅड चा वापर आरोग्यदायी असल्याचे  वैद्यकीय सूत्रांनीही स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून सुरु करण्यात येणार्‍या अस्मिता योजनेची जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत जिल्हास्तरावर अंमल बजावणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  उमेद अभियान सुरु केले आहे.  योजनेतील लाभार्थी मुलींना अस्मिता कार्डस् देण्यात येणार  आहेत. तसेच स्वयंसहाय्यता  महिला बचत गटांना देखील सॅनिटरी पॅड पुरवठा व विक्रीसोबतच मुली व महिलांच्या समुपदेशनाचे काम देण्यात येणार आहे. या गटांना यासाठी अस्मिता मोबाईल अ‍ॅपवर नोंदणी करुन पुरवठादाराकडून गरज व मागणीनुसार पॅड मिळतील.   त्यानंतर ते ग्रामीण महिला व मुलींना वितरीत केले जातील.  यामुळेे संबंधित स्वयंसहायता गटांव्यावसायिक उत्कर्ष  होण्यास मदत होणार आहे.