Thu, Apr 25, 2019 23:56होमपेज › Satara › झेडपीने ३ हजार ४९४ बालकांना दिले जीवदान

झेडपीने ३ हजार ४९४ बालकांना दिले जीवदान

Published On: Jun 18 2018 1:12AM | Last Updated: Jun 17 2018 11:16PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3 हजार 521 बालके विविध आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यापैकी  3 हजार 494 बालकांच्या शस्त्रक्रिया करुन झेडपीने या बालकांना जीवदान दिले आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातून सातारा जिल्ह्यातील यशस्वी शस्त्रक्रिया पार पडलेल्या बालक व त्यांच्या पालकांचा कौतुक सोहळा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. कोरेगाव तालुक्यातील श्रध्दा मदने हिला हदयविकार असल्याने शस्त्रक्रिया किचकट व खर्चीक होती. धिरूभाई अंबाणी हॉस्पिटल मुंबई व फोर्टीस हॉस्पिटल मुंबई येथे शस्त्रक्रिया होत नसल्याने परत पाठवण्यात आले होते. याबाबतची माहिती जि.प.चे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी  ही शस्त्रक्रिया करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्‍वासन देवून मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सिध्दिविनायक ट्रस्ट, साईबाबा ट्रस्टच्या माध्यमातून 5 लाख 50 हजार खर्च करून ही शस्त्रक्रिया हर्डीकर हॉस्पिटल पुणे येथे यशस्वीरित्या पूर्ण करून श्रध्दाला नवजीवन मिळवून दिले.

राहुल भुपिंदर यादव हा मुळचा बिहार या ठिकाणचा रहिवासी. बिगारी कामानिमित्त सातारा येथे वास्तव्यास आहे. अंगणवाडी तपासणी दरम्यान हदयविकार असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी ओपन हॉर्ट सर्जरी करण्याची आवश्यकता होती. रहिवासी दाखले व अन्य दाखले नसताना शासकीय योजनेचा लाभ  मिळू शकत नव्हता, तेव्हा जिल्ह्यातील  सर्व वरिष्ठ  अधिकार्‍यांनी संबंधित हॉस्पिटल मॅनेजमेंट व ट्रस्टशी बोलून 4 लाख 50 हजार रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

कविता बोरा, आराध्या अतुल रोकडे, साक्षी शेळके, सोहम चव्हाण, वैष्णवी मोहिते, सोहम माने, गायत्री माने, सायली कदम, समर्थ पिसे  अशा अनेक रूग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सातारा आरोग्य विभागाने दुर्धर आजारी बालकांचे उपचार करताना देश व राज्याच्या सिमा भेदून त्यांना निरोगी आरोग्य बहाल केले, हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

कौतुक सोहळा जि.प.अध्यक्ष  संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण  सभापती शिवाजी सर्वगोड, महिला व बालकल्याण  सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश पाटील, सभापती, जि.प. सदस्य व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचा शैक्षणिक साहित्य देवून  गौरव करण्यात आला.