Fri, Apr 26, 2019 03:57होमपेज › Satara › पाटण तालुक्यातील  घाटरस्त्यांची ‘वाताहात’

पाटण तालुक्यातील  घाटरस्त्यांची ‘वाताहात’

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 8:45PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

घाटांचा तालुका म्हणून पाटणची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांत याच घाटांची व स्थानिक रस्त्यांची झालेली दयनिय अवस्था हे नेहमीच अपघातासाठी आमंत्रण व कारण ठरताहेत. बहुतांशी ठिकाणी संरक्षक भिंत, कठडयांची पुरती वाट लागली असून बाजूचे रस्तेही खचले आहेत. कागदोपत्री व आश्‍वासने तथा घोषणातून येथे विकास कामांची कोट्यवधीची उड्डाणे होत असली तरी प्रत्यक्षात मात्र या घाटांची पुरती वाट लागल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळत आहे. 

पाटण तालुका हा पुर्वी भौगोलिकदृष्ट्या पूर्णतः अडचणींचा होता. वेगवेगळ्या सात खोर्‍यात विखुरलेल्या याच तालुक्यातील अनेक विभाग एकमेकांना जोडण्यासाठी प्रामुख्याने घाट फोडूनच येथे रस्ते व एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न सन 1983 सालानंतर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नाने झाला. त्यातूनच हा संपूर्ण तालुका एकमेकांशी जोडला गेला. 

या तालुक्यात समाविष्ट असणारा सर्वात महत्वाचा घाट म्हणजे कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र जोडणारा कुंभार्ली घाट कोयना विभागातील बोपोली ते घाटमाथा यामध्ये या तालुक्यातील घाट रस्त्याचा समावेश आहे. मुळातच खिळखिळ्या झालेल्या याच ठिकाणी आता कराड चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कामाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे या दुरावस्थेला सध्यातरी येथे कोणीही वाली नाही हीच वस्तुस्थिती आहे.

ढेबेवाडी विभागाला जोडणारा घाटाची तर सार्वत्रिक दुरावस्था ही कायम पाचवीलाच पुजलेली असते. दिवशी घाटाचेही दुखणे तसेच आहे. तारळे विभागाला जोडणारा सडा वाघापूर मार्गे जाणारा असो किंवा जळव मार्गे जाणारा घाट हा कायमच जीव मुठीत धरून तेथून प्रवास करावा लागतो. तर तोच अनुभव चाफळ विभागातील सडा दाढोली घाटातही अनुभवायला मिळतो. तालुक्यात यापुर्वी भरपूर घाट झाले. विभाग व माणसंही माणसांशी जोडली गेली ही वस्तुस्थिती खरी आहे. मात्र ज्या काळात या विभागात वाहनांची संख्या व दळणवळण कमी होते त्याकाळात ही व्यवस्था पुरेशी व सुखकर होती. मात्र अलीकडच्या काळात येथे सार्वत्रिक दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढले मात्र त्या तुलनेत अपुरे रस्ते व दुरावस्थेमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. तर कित्येकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. अनेक घाटात येथे होणार्‍या अतिवृष्टी व सततच्या भुकंपामुळे दरडी कोसळणे, भुत्स्खलन होत असते.

मात्र संबंधित विभागांकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी होत असते. बहुतांशी ठिकाणी संरक्षक भिंती, कठडे अस्तित्वातच नाहीत तर यापूर्वी जेथे ते होते त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्त्यांचे अंतर कमी होवून त्याचाही त्रास होत आहे. तर वर्षानुवर्षे काही ठिकाणचे नालेच काढण्यात आले नाहीत. केवळ घोषणा, अश्‍वासनांच्या फैरी व मंजूर कामात पोसलेली ठेकेदारी व त्यातून मिळणार्‍या टक्केवारी यासाठीच या घाट कामांच्या देखभाल दुरुस्तीचा ‘घाट’ घातला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र येथे बहुतांशी घाटांची सार्वत्रिक ‘वाट’ लागल्याने येथे आता आंबेनळी घाटात झालेल्या मोठ्या दुर्घटनेसारखी घटना घडल्या नंतरच संबंधितांचे डोळे उघडणार का ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.