होमपेज › Satara › मानधन अन् प्रवास भत्त्यातच सामान्य प्रशासन गुंग

मानधन अन् प्रवास भत्त्यातच सामान्य प्रशासन गुंग

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 10:40PMसातारा : प्रवीण शिंगटे 

सातारा जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन हा महत्वाचा विभाग समजला जातो. या विभागासाठी सुमारे 2 कोटी 58 लाख 81 हजार रुपयांची तरतूद केली असली तरी पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या वाहनांच्या दुरूस्ती, विमा, पदाधिकारी व सदस्यांचे भत्ते  देण्यातच सामान्य प्रशासन गुंग आहे. मात्र प्रत्यक्ष मार्चअखेर हा निधी खर्च होणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

जिल्हा परिषद सेस फंडातून सामान्य प्रशासन विभागासाठी पदाधिकारी मानधन व भत्यासाठी 84 लाख 45 हजार रुपयांची तरतूद केली होती तर सामान्य  प्रशासन परिषद सादिलसाठी 1 कोटी 74 लाख 36 हजार रुपयांची तरतूद केली होती.अध्यक्षांच्या मानधनासाठी 2 लाख 40 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यापैकी 2 लाख रुपये खर्च झाले आहेत. उपाध्यक्ष, विषय समिती, पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या मानधनासाठी 31 लाख 51 हजार रुपये मंजूर केले होते. पैकी 28 लाख 97 हजार रुपये खर्च झाले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व उपसभापती यांना प्रवास भत्त्यासाठी 4 लाख 38 हजार रुपये मंजूर केले होते त्यापैकी फक्त 1 लाख 90 हजार खर्च झाले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना सभा प्रवास भत्यासाठी 9 लाख 99 हजार रुपयांच्या मंजूर निधीपैकी 6 लाख 30 हजार रुपये खर्च झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्यांना दरमहा 3 हजार रुपयांप्रमाणे प्रवासभत्त्यापोटी  व पंचायत समिती सदस्यांना प्रवासभत्त्यापोटी मिळणार्‍या 36 लाख 17 हजार रुपयांपैकी 29 लाख 8 हजार  रुपये खर्च झाले आहेत.

शिक्षण विभाग वेतन व भत्त्यासाठी  मंजूर निधीपैकी सर्वच्या सर्व 5 लाख 39 हजार रुपये खर्च झाले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी प्रशिक्षणासाठी  1लाख 35 हजार मंजूर निधीपैकी 85 हजार रुपये खर्च झाले आहेत.

प्रशासकीय रचना, कार्यपध्दती  सुधारणा व ई गव्हर्नससाठी 8 लाखाची तरतूद केली होती मात्र प्रत्यक्षात त्यासाठी 4 लाख 38 हजार रुपये खर्च झाले आहेत.  वर्ग 4 कर्मचारी पांढरा गणवेश, उलन गणवेश कापड खरेदी व शिलाईसाठी  68 हजार रुपयांची तरतूद होती मात्र गणवेशावर पैसेच खर्च झाले नसल्याचे दिसून येत आहे. यशवंत आदर्श पुरस्कारासाठी 50 हजाराची तरतूद होती प्रत्यक्षात मात्र 27 हजार रुपयेच खर्च झाल्याचे दिसत आहे.

या विभागाच्या  2 कोटी 58 लाख 81 हजार रुपयांच्या मंजूर निधीपैकी 1 कोटी 92 हजार रुपयांचा निधी विविध कामांवर खर्च झाला असल्याचे सामान्य प्रशासन विभागामार्फत सांगण्यात आले. मात्र 66 लाख 49 हजार रुपयांचा अखर्चित निधी मार्च महिन्यापर्यंत तरी खर्च होणार का? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.    

सदस्यांना वेळेवर भत्ते व मानधन मिळते का?

अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती यांचे मानधन, प्रवास भत्ते, सदस्य प्रंवास भत्ते, कर्मचारी प्रशिक्षण, प्रशासकीय रचना व कार्यपध्दती सुधारणा, वर्ग 4 कर्मचारी गणवेश कापड खरेदी व शिलाईसाठी या निधीची तरतूद  आहे. मार्चपर्यंत तरतूद केलेला  सर्व निधी  सामान्य प्रशासन विभाग खर्च करणार आहे. मात्र हा खर्च कागदोपत्रीच दाखवला गेला आहे. जि. प. व पं. स. सभाच्यावेळी सदस्यांच्या सह्या ज्या  त्या वेळी घेतल्या जातात मात्र सदस्यांना वेळेवर भत्ते व मानधन मिळते का? याबाबत  साशंकता आहे.