Wed, Jul 24, 2019 12:17होमपेज › Satara › ‘पुस्तकाचं गाव’ दहावीच्या पुस्तकात

‘पुस्तकाचं गाव’ दहावीच्या पुस्तकात

Published On: Apr 08 2018 2:19AM | Last Updated: Apr 07 2018 10:51PMभिलार  : मुकुंद शिंदे

वीर पत्नी स्वाती महाडिक यांची गौरवगाथा शालेय पुस्तकात समाविष्ठ झाल्यानंतर सातारा जिल्हावासियांसाठी आणखी एक आनंदाची बाब आहे. पुस्तकाचं देशातील पहिलं गाव ठरलेलं भिलार व पाचगणी-महाबळेश्‍वरची गाथाही दहावीच्या पुस्तकात अवतरल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.

इयत्ता दहावीची नवीन पाठ्यपुस्तके औत्सुक्याचा विषय ठरली आहेत. या पुस्तकात रंगीत चित्रे, आवश्यक तेथे वैचारिक क्षमतेला वाव, अँपच्या माध्यमातून, क्यू आर कोडच्याद्वारे अध्ययन - अध्यापन आणि भरपूर कृतींचा समावेश आहे. नवीन पाठ्यपुस्तकातून शालेय जीवणातील अभ्यासक्रमाचा दैनंदिन जीवनशैलीशी सांगड घातल्याने विद्यार्थी परिक्षार्थी न राहता ज्ञानरचनावादी होणार आहे. दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकावरील मुखपृष्ठावर देशातील पहिल्या पुस्तकाचे गाव भिलार याचा लोगो तसेच संकल्पनेची माहिती व पाचगणी-महाबळेश्‍वर याठिकाणांचा समावेश केला आहे.

भिलार हे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र शासन यांच्या संकल्पनेतून साकारलेले देशातील पहिले पुस्तकाच गाव असून यात मराठी भाषेतील कथा, कादंबरी, आत्मचरित्र, संतसाहित्य, ललित, स्त्रीसाहित्य, नाटक, वैज्ञानिक साहित्य, बालसाहित्य, पर्यटन अशा साहित्य प्रकारातील सुमारे पंधरा हजार पुस्तके आहेत. शाळा, समाजमंदिर, घरे, पर्यटक निवासस्थाने आशा सुमारे पंचवीस ठिकाणी वेगवेगळे साहित्य प्रकार ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात या गावाला मराठी चित्रपटातील कलाकार, तसेच साहित्य क्षेत्रातील मान्यवर लेखक, कवी, गायक यांसह हजारो वाचकांनी भेट दिली आहे. स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले हे गाव देशाबरोबर परदेशातही नावाजले आहे. आता दहावीच्या अभ्यासक्रमातील समावेशाने आणखी एक मानाचा तुरा जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला आहे. त्याचबरोबर पाचगणी - महाबळेश्‍वरही या पुस्तकात असल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना या ठिकाणांची महती समजणार आहे.