Mon, Jun 17, 2019 15:27होमपेज › Satara › चरेगाव येथे गॅस्ट्रोसदृश साथ; ३० जणांना लागण

चरेगाव येथे गॅस्ट्रोसदृश साथ; ३० जणांना लागण

Published On: May 15 2018 1:33AM | Last Updated: May 14 2018 11:22PMउंब्रज : प्रतिनिधी

चरेगाव (ता. कराड) येथे दूषित पाण्यामुळे गावातील सुमारे तीस जणांना गॅस्ट्रोसदृश साथीची लागण झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांमध्ये वाढ झाल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, चरेगाव येथे आ. बाळासाहेब पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. 

शिवडे, साकुर्डी पाठोपाठ चरेगाव (ता. कराड) येथे गॅस्ट्रोसदृश साथीचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी रुग्णांची संख्या 30 च्या आसपास गेल्याने ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागे झाले.  रुग्णांवर उंब्रज, कराड आणि सातारा येथे उपचार सुरू आहेत.   

रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समजताच आ. बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी चरेगावकडे धाव घेऊन पाणी यंत्रणेची व गावास पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या नागझरी नावच्या विहिरीची पाहणी केली. संबंधित विहिरींचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याच्या सूचना केल्या. या विहिरी लगत ओढा असल्याने ओढ्याचे पाणी पाझरून विहिरीत मिसळत असल्याने विहिरीचे पाणी दूषित  झाले आहे. 
उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी रूग्णांची तपासणी केली. यामध्ये 29 रूग्ण आढळून आल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले. याबाबत ग्रामविकास अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले चरेगांव मध्ये पाण्याचे नऊ स्त्रोत असून येथील पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.

22 एप्रिल पासून नागझरी विहीरीचे पाणी टाकीत सोडण्याचे बंद केले आहे त्यामुळे या विहिरीतील पाण्यामुळे साथ पसरली नसावी असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या गावास पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीतील  पाणी तपासणी करण्याबरोबरच  मेडिक्लोअरचे वाटप ग्रामस्थांना  करण्यात आले आहे.