Sat, Aug 24, 2019 23:16होमपेज › Satara › कचर्‍यातून शोधतात ‘त्या’ भाकरीचा चंद्र

कचर्‍यातून शोधतात ‘त्या’ भाकरीचा चंद्र

Published On: Mar 07 2018 11:28PM | Last Updated: Mar 07 2018 8:06PMसातारा : प्रतिनिधी

कचरा चाळून आयुष्य कंठणार्‍या अनेक महिला आपल्या संसाराला हातभार लावत आहेत. दिवसभर उन्हातान्हात राबणार्‍या या महिला दिवसाकाठी 150-200 रुपये गाठीशी बांधतात. 20-20 वर्षे हे काम करणार्‍या महिला आजही कचर्‍यासारखं उपेक्षित दुर्लक्षित जीणं जगत आहेत भाकरीचा चंद्र शोधण्यासाठीच. दररोजचं आयुष्यच कचर्‍यात गेलेल्या या महिलांना कुठला महिला दिन अन्  कुठलं काय? 

ना हजेरी पुस्तक, ना मुकादम तरीही त्यांचे हात दिवसभर राबतात. उन्हातान्हाची पर्वा न करता वर्षानुवर्षे त्यांचा हा दिनक्रम सुरु आहे. शंभर रुपड्यासाठी त्यांची ही लढाई सुरु असते. वेतन, सेवानिवृत्ती वेतन, फंड, प्रसूतीची रजा, ओव्हर टाईम, आजारपण हे शब्द त्यांच्या कोशातच नाहीत तरीही त्यांचे हात चालतात, झोपडीतील चूल धगधगती ठेवण्यासाठी व पोटातील आग शांत करण्यासाठी.

शहराच्या ठिकाणी दररोज सुमारे 10-15  महिला  कचर्‍यातून प्लास्टिक, लोखंड, काचा गोळा करुन कुटुंबाची रोजीरोटी चालवतात. या कचरा डेपोत समाजातील उपेक्षितांचे विदारक चित्र पहायला मिळते. रणरणत्या उन्हात कोसळणार्‍या पावसात त्यांचे हात चालत असतात. खुरपं किंवा लोखंडी सळईच्या सहाय्याने पडलेला कचरा उचकटून त्यातून पुनर्वापरासाठी योग्य वस्तू त्या गोळा करतात. मेलेली, अर्ध कुजलेली जनावरे, नाकाला झोंबणारी दुर्गंधी, किळसवाणे दृश्य, अंगावर बसणार्‍या माशा, कशाचीच पर्वा न करता कचर्‍यातच संध्याकाळच्या भाकरीचा चंद्र शोधण्याचे त्यांचे काम अव्याहतपणे सुरु असते. दिवसभर गोळा केलेल्या मालातून चार पैसे मिळाले तरच ज्वारीचे पीठ, तांदूळ, बाटलीभर तेल, चटणी त्यांच्या  घरी जाते.  जाता जाता वेचलेल्या काटकांवरच त्यांच्या घरातील चूल पेटते. 

मोळाचा ओढा, लक्ष्मीटेकडी, रामनगर, गजवडी, माजगावकर माळ झोपडपट्टी, प्रतापसिंहनगर आदि ठिकाणी राहणार्‍या या महिला भल्या सकाळी सात - साडेसात वाजता प्लास्टिकची गोणपाट घेऊन घराबाहेर पडतात. दुपारी 12 वाजता कुठेतरी झाडाची सावली पाहून आणलेल्या भाकरीचा तुकडा मोडतात. चार घास खाल्‍ले की पुन्हा सुरु झालेला त्यांचा शोध सायंकाळी चार वाजता त्या दिवसासाठी थांबतो. दिवसभरातील शोधाशोधीनंतर क्‍वचित 500 रुपये तर बर्‍याच वेळा दोन - तीनशे रुपये त्यांना मिळतात. कोणाचा नवरा गवंड्याच्या हाताखाली, कोणाचा रंग कामाचा व्यवसाय तर कोण निराधार. घरात खाणारी तोंड चार, सहा अमर्याद, कमावणारे  हात फक्‍त दोनच. या हातांना कष्टाचे पाठबळ देण्यासाठी त्यांचा हा कष्टाचा प्रवास आजही सुरू आहे.