Tue, Mar 26, 2019 12:07होमपेज › Satara › सातार्‍यात कचरा वर्गीकरणाचा बोजवारा

सातार्‍यात कचरा वर्गीकरणाचा बोजवारा

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 12:23AMसातारा : महेंद्र खंदारे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत असणारे कचर्‍याचे डोंगर कमी व्हावे. यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु, सातारा पालिकेने हा विषय अजूनही गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. ओला व सुका कचरा करून त्याचे खत तयार करावे, अशा सूचना राज्य शासनाने केल्या आहेत. त्यानुसार दि. 31 मेपर्यंत कचरा वर्गीकरणाची प्रकिया पूर्ण केली पाहिजे. मात्र, सातार्‍यातील अनेक भागात कचर्‍याचे वर्गीकरणच केले जात नाही. त्यामुळे मोठी समस्या उभी राहिली आहे. यासाठी कोणत्याही परिस्थिती पुढील 24 दिवसांमध्ये योग्य पध्दतीने कचरा वर्गीकरण करणे आवश्यक बनले आहे. अन्यथा पालिकेची सर्व अनुदाने रोखण्याची कारवाई होण्याची चिन्हे आहेत. 

राज्यामध्ये सध्या कचर्‍याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. सातार्‍यातही यापेक्षा वेगळी अशी परिस्थिती नाही. सातारा येथील सोनगाव कचरा डेपोवर गेल्या 30 वर्षांपासूनचा कचरा साठला आहे. त्यामुळे कचर्‍याचे डोंगर उभे राहू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले गेले आहेत. त्याचबरोबर बैठका व कार्यशाळा घेऊनही कोणतीच प्रगती न झाल्याने थेट अनुदान बंद करण्याचा निर्णय आता शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता पाणी गळ्यापर्यंत आल्याने सर्व पालिकांना कचर्‍याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.  

सातारा शहराची लोकसंख्या सव्वा लाखाहून अधिक आहे. तसेच शहराच्या जवळ असणार्‍या उपनगरांचा कचराही पालिकेच्याच डेेपोवर पडतो. त्यामुळे दिवसाला 50 टनहून अधिक कचरा डेपोवर टाकला जातो. गेल्या चार महिन्यांपासून कचरा वर्गीकरण करणे सुरू केले आहे. मात्र, घंटागाडी चालक आणि आरोग्य विभागच याबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे. नगरपालिकेची निवडणूक होऊन आता वर्ष झाले तरी घंटागाडीची व्यवस्था आरोग्य विभागाला करता आलेली नाही. अजूनही बर्‍याच भागात घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कचरा वर्गीकरण कागदावरच राहिले आहे. 
ज्या भागात घंटागाडी जाते त्या भागात जाणार्‍या गाडीत कचरा वर्गीकरणसाठी दोन विभाग केले आहेत. मात्र, ओला कचरा टाकण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्याला हरताळच फासला जात आहे. मुळात नागरिकच घरात ओला व सुका कचरा करत नसल्याने ही वेळ आली आहे. घंटागाडीत जे कर्मचारी असतात ते व्यवस्थितपणे नागरिकांना सांगतात. मात्र, काही वेळा नागरिकांकडून ओला व सुका दोन्ही कचरा एकत्रच टाकण्यात येतो. त्यामुळे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. 

कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी फक्त कचरा जाळणे हाच एक पर्याय अवलंबला जात आहे. त्यामुळे पाणी व वायू प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. याबाबत प्रदूषण मंडळानेही वारंवार पालिकेला नोटीसा देऊन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेला कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी 14 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अद्याप त्याचे कामच सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे कचरा विल्हेवाट प्रकल्पाचे घोंगडे भिजतच आहे. 

शहरात दररोज जमा होणारा कचरा हा ओला व सुका कचरा, अशी विभागणी करून स्वीकारण्यासाठी नगरपालिकांना मे तर महापालिकांना जून 2018 ची मुदत देण्यात आली आहे. हा कचरा घरोघरी जाऊन विभागणी केलेल्या स्वरूपातच स्वीकारण्याचे व त्याच स्वरूपात त्याची वाहतूक करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. या कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.  त्याची हरित महासिटी कंपोस्ट या नावाने विक्री करण्यात यावी. त्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचलनालयाची परवानगी घेेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

... तर पालिकेचे अनुदान रोखणार
1 टन कचर्‍यापासून 150 ते 200 किलो कंपोस्ट खत तयार होणार असून एका महिन्यात 4 ते 6 टन खताची निर्मिती होणार आहे.  असे झाले तरच त्या शहरातील संपूर्ण कचर्‍याची विभागणी केली जात असल्याचे समजण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे. संबंधित पालिका व महापालिका जी आकडेवारी देणार आहे त्याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी केली जाणार आहे. ही सर्व प्रकिया न केल्यास पालिका व महापालिकांची सर्व अनुदाने थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे पालिकांना कचरा प्रकल्प उभारणे आता बंधनकारक होणार आहे.

Tags :  satara city, Garbage