Wed, Jul 17, 2019 10:55होमपेज › Satara › गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच

गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 10 2018 11:16PMसातारा : प्रतिनिधी

विसर्जनतळी उपलब्ध होत नसताना सातारा विकास आघाडीवर खासदार आपली जबाबदारी झटकत असल्याचे आरोप करत काही मंडळींनी आमच्यावर तोंडसुख घेतले. गणेश भक्‍तांना नाराज करुन कृत्रिम तळी खोदण्यास भाग पाडून नगर विकास आघाडीच्या काही चमको नगरसेवकांनी सभेच्या मंजुरीशिवाय तत्कालीन मुख्याधिकार्‍यांना मंगळवार तळे व मोती तळ्यासंदर्भात हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पाडले.  त्याचे समर्थन उलट्या काळजाची व्यक्‍तीच करु शकते. मात्र, उच्च न्यायालयाने मंगळवार तळे विसर्जनास सोमवारी परवानगी दिल्याने विसर्जन प्रश्‍नाचा बागुलबुवा करणार्‍यांचे दात घशात गेले, असा टोला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी लगावला.

गणेश विसर्जन तळ्यांची व्यवस्था होत नसल्याने विविध चर्चांना सातारा शहरात उधाण आले होते. मंगळवार तळे, मोती तळे तसेच फुटका तलाव याठिकाणी विसर्जनास परवानगी मिळावी, यासाठी हायकोर्टात सातारा नगरपालिकेने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी दुपारी सुनावणी झाली.  या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने निर्णय दिला. या पार्श्‍वभूमीवर  खा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात  म्हटले आहे, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सातार्‍यातील श्री गणेशाच्या आगमनापेक्षा विसर्जनाचीच अधिक चर्चा यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर काही उलट्या काळजाच्या विघ्नसंतोषी व्यक्‍तींकडून जाणीवपूर्वक होत होती. विसर्जनाच्या प्रश्‍नाविषयी सातारा नगरपालिकेला गांभीर्य नाही, आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न खासदारांकडून होत आहे, विसर्जनास मंगळवार तळे उपलब्ध झाले नाही तर गणेश भक्‍तांचा रोष ओढवेल, अशा प्रकारचे बेताल वक्‍तव्य करुन आमच्यावर आणि सातारा विकास आघाडीवर अकारण तोंडसुख घेण्याचा प्रकार काही व्यक्‍तींकडून जाणूनबुजून सुरु होता.

तळ्यांमधील विसर्जनाकरता काही व्यक्‍तींचा विरोध होता. विसर्जनानंतर तळ्यांची योग्य प्रकारे आणि वेळच्यावेळी स्वच्छता होत नाही याकरता त्यांचा विरोध होता. परंपरा मोडीत काढण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यामुळे त्यांचा विरोधही रास्त होता. त्याचवेळी 2015 साली उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावेळी नगरपालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकार्‍यांवर दबाव टाकून कृत्रिम तळे काढणे आणि मुजवणे यामध्ये ज्यांचा इंटरेस्ट होता अशा नगर विकास आघाडीच्या तत्कालीन दोन चमको  नगरसेवकांनी नगरपालिका सभेची मंजुरी न घेता उच्च न्यायालयात नगरपालिका मोती तळ्यात विसर्जन होवू देणार नाही, असे प्रतिज्ञपत्र सादर करायला भाग पाडले. प्रतिज्ञापत्र दिल्याने उच्च न्यायालयाने जनहित याचिका खारीज केली. सभेच्या मंजुरीशिवाय प्रतिज्ञापत्र करायला ज्यांनी भाग पाडले त्यांच्या त्यावेळच्या भूमिकेचे समर्थन फक्‍त उलट्या काळजाची व्यक्‍तीच करु शकते, असा टोला खा. उदयनराजे यांनी हाणला.

तपपूर्वी कृत्रिम तळे उभारलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेभोवती मोठी भिंत बांधण्याचे काम  यंदा सुरु केले गेले. त्यामुळे ती जागा नगरपालिकेला परत उपलब्ध होण्याची शक्यता संपुष्टात आली. रिसालदार तळ्याचा पर्याय आम्ही सुचवला. तत्कालीन पोलिस प्रमुखांबरोबर पहाणी केली. या तळ्याला हरकत नसल्याचे म्हणणे प्रथम पोलिसांनी दिले. मात्र नंतर कुणाच्या तरी दबावाखाली नकार देत पोलिस दलाने घुमजाव केले. केवळ नगरपालिकेत सातारा विकास आघाडीची सत्‍ता असल्यामुळे अशा प्रकारे सर्व बाजूंनी कोंडी करणार्‍या धेंडांचे  दात हायकोर्टाच्या निर्णयामुळे घशात गेले आहेत. शक्य तितक्या लवकर तळ्याची स्वच्छ करण्याची अट नगरपालिकेस घातली आहे. नगरपालिका तळ्याची वेळेत स्वच्छता करेल, अशी अपेक्षाही खा. उदयनराजे यांनी व्यक्‍त केली.