Sun, Mar 24, 2019 12:25होमपेज › Satara › गणेश विसर्जन मंगळवार, मोती तळ्यांतच

गणेश विसर्जन मंगळवार, मोती तळ्यांतच

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:18PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत हाय कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यावर सातारा नगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसेवकांचे एकमत झाले.  मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव या पारंपरिक तळ्यांशिवाय गणेश व दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी दुसरी तळी उपलब्ध नाहीत. विसर्जनानंतर संबंधित तळ्यांची स्वच्छता करावी, असा ठराव सभेत घेण्यात आला. दरम्यान, मंगळवार तळ्याची मालकी खा. उदयनराजे भोसले यांची असतानाही तळ्यात विसर्जनास मनाई करणे यावरून जिल्हाधिकार्‍यांचे कायद्याविषयी अज्ञान स्पष्ट करते, अशी टीका नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर यांनी केली.

सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची विशेष सभा पार पडली. गणेशोत्सव जवळ आल्याने विसर्जन तळ्यांचा प्रश्‍न जिव्हाळ्याचा बनला असतानाच हायकोर्टातील कायदेशीर कामकाजाबाबत आवश्यक असलेल्या बाबी पूर्ण करण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली. सभेत काही बाबी सभागृहासमोर आणण्यात आल्या. गेल्या तीन वर्षांत कृत्रिम तळी व गणेशोत्सवावर सुमारे 95 लाख  खर्च झाला. नगरपालिकेचे 50-60  अधिकारी व कर्मचारी या काळात राबत असतात. तळी मुजवण्यासाठी अतिरिक्‍त खर्च करावा लागतो. ही बाब नगरपालिकेला परवडणारी नाही. तसेच शहरात मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव या तळ्यांव्यतिरिक्‍त विसर्जनासाठी अन्य तळी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या तळ्यांतच गणेश व दुर्गा मूर्तींचे विसर्जन करुन ती तळी उत्सवानंतर स्वच्छ करावी, अशी भूमिका मांडण्यात आली.

यावेळी नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले, तळ्यांच्या प्रदूषणासंदर्भात 2005 साली डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी हायकोर्टात पहिली याचिका दाखल केली. गणेश विसर्जनासंदर्भात कोणतेही नियम नाहीत. केंद्र सरकारने कमिटी स्थापन करुन मार्गदर्शक सुचना केल्या. 2010 साली यासंदर्भात जाहीर केलेल्या नियमावलीनुसार कार्यवाही करण्याच्या कोर्टाच्या सुचना आहेत. त्यानंतर 2015 साली सुशांत मोरे यांनी ऐतिहासिक तळ्यांत विसर्जन करु नये यासाठी हायकोर्टात याचिका  दाखल केली. त्यावर तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी कोर्टात मंगळवार तळे व मोती तळे विसर्जनास बंदी करत असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. दोन्ही तळ्यात विसर्जनासंदर्भात कोणताही आदेश कोर्टाने दिलेला नाही.  मंगळवार तळे  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मालकीचे असल्याने त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी मत नोंदवणे चुकीचे होते.  या तळ्याचा आणि प्रशासनाचा काहीच संबंध नाही आणि हाय कोर्टाने शहरातील कुठल्याही तळ्यात गणेश विसर्जन करु नका असे म्हटलेले नाही किंवा विसर्जनास बंदी घातलेली नाही.  असे असतानाही जिल्हाधिकारी मंगळवार तळ्यात विसर्जनासाठी हायकोर्टाची परवानगी मागत असतील तर त्यावरुन त्यांचे कायदेविषयक अज्ञान स्पष्ट होत आहे. यावेळी अ‍ॅड. बनकर यांनी विसर्जनाबाबत हायकोर्ट तसेच सीपीसीबी, एमपीसीबी व संबंधित समित्यांनी केलेल्या सुचनांवर सविस्तर चर्चा केली. केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार विसर्जन केले तर काहीच अडचण येणार नाही. सरकारी वकिलांनी सांगूनही जिल्हाधिकार्‍यांकडून तळ्यांत विसर्जनास विरोध होत असल्याचे सांगत अ‍ॅड. बनकर यांनी आश्‍चर्य व्यक्‍त केले.

विरोधी पक्षनेते अशोक मोनेे म्हणाले, दोन्ही तळ्यांत विसर्जन व्हावे, यासाठी पूर्वीपासून आग्रही होतो. मात्र, सर्वांचे यावर एकमत झाल्यानंतर नगरसेवक व आजी-माजी पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने खा. उदयनराजे यांची भेट घेतली. त्यांनीही संबंधित तळ्यांत विसर्जनास परवानगी दिली. हा लढा सर्वांमुळे यशस्वी झाला.

नगरसेवक विजय काटवटे म्हणाले, सभेत निर्णय घेण्यात आला असला तरी  पुन्हा कृत्रिम तळ्यांचा घाट घालायला नको. चुकीच्या पध्दतीने हा विषय हाताळून नगरपालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड सहन करायला लागल्याने तत्कालीन मुख्याधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काटवटे यांनी केली.  

सौ. माधवी कदम म्हणाल्या,  सभागृहात विविध विषयांवरुन सभागृहात मतभेद होत असतात. मात्र, गणेशोत्सवासारख्या महत्वाच्या विषयावर सर्वजणांनी सभागृहात एकजूट दाखवली. खा. उदयनराजे भोसले यांच्यामुळे या विषय निकाली निघाला. सार्वजनिक हिताच्या, सातारकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर अशीच एकी पुढेही राहो,  अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.