कराड : गुलालमुक्तीकडे गणेश मंडळांची वाटचाल

Published On: Sep 12 2019 4:11PM | Last Updated: Sep 12 2019 4:11PM
Responsive image


कराड : प्रतिनिधी 
राजकीय, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रात राज्याला सकारात्मक दिशा देणाऱ्या कराडमध्ये यावर्षी बहुतांश गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलाल उडवण्यासह फटाके वाजवण्याचे टाळले आहे. त्यामुळेच कराडची गणेश विसर्जन मिरवणूक गुलालमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे सुखद चित्र गुरुवारी पहावयास मिळाले.

गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणूक मार्गातील मुख्य व अखेरचा चौक मानल्या जाणार्‍या चावडी चौकातून मलकापूरच्या आगाशिवनगर येथील अजिंक्य गणेश मंडळांची मिरवणूक कृष्णा घाटाकडे मार्गस्थ झाली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे 35 मंडळाच्या मिरवणुका विसर्जनासाठी चावडी चौकातून मार्गस्थ झाल्या होत्या. या 35 मंडळापैकी केवळ दोनच गणेश मंडळांनी गुलालाची उधळण करत फटाके वाजवले होते. तर अन्य गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्ये, वेशभूषा करत मिरवणूक काढली होती.