Mon, Aug 19, 2019 07:49होमपेज › Satara › ‘गडचिरोली कनेक्शन’ कराडात आले कामी

‘गडचिरोली कनेक्शन’ कराडात आले कामी

Published On: Jun 21 2018 1:20AM | Last Updated: Jun 20 2018 11:44PMकराड : चंद्रजित पाटील 

दोन वर्षापूर्वी संदीप पाटील, प्रणय अशोक हे सातारा, रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक अन् नवनाथ ढवळे, उपनिरीक्षक संदीप वागंणेकर हे सर्वजण गडचिरोलीत एकत्रितरित्या सेवा बजावत होते. पुढे ते सर्वजण सातारा, रत्नागिरीत बदलून आले होते. मंगळवारी योगायोगाने निवृत्त उपअधीक्षक चिपळूण पोलिस ठाण्यात गेले आणि पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर, उपनिरीक्षक वागंणेकर हेच पोलिस ठाण्यात हजर होते. त्यानंतर सूत्रे हालली आणि ‘गडचिरोली’चे कनेक्शन कराडच्या गुन्ह्यात कामी आले आणि संशयितही मूळच्या कराडमधील पोलिस अधिकार्‍यांच्या हाती लागले.

2016 पर्यंत सातार्‍याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह चिपळूणचे पोलिस उपनिरीक्षक संदीप वागंणेकर गडचिरोलीत कार्यरत होते. याशिवाय संगमेश्‍वर पोलिस ठाण्याची जबाबदारी ओगलेवाडी (कराड) येथील पोलिस निरीक्षक महेश थिटे यांच्यावरच आहे.  योगायोगाने चिपळूनचे डे ऑफिसर म्हणून संदीप वागंणेकर यांच्याकडेच मंगळवारी जबाबदारी होती. महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांचा एकमेकांशी असणारा परिचय आणि कराडशी नाते असणार्‍या अधिकार्‍यांची तैनाती यामुळे सर्वांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर पूर्वीपासूनच होते. त्यामुळे कोणालाही एकमेकांचा नंबर शोधावा लागला नाही आणि त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ वाचला आणि पुढे हाच वेळ संशयितांना पकडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.

निवृत्त उपअधीक्षक बसवराज चौकीमठ हे चिपळूण पोलिस ठाण्यात पोहचले, त्यावेळी ते थेट वागंणेकर यांनाच भेटले. गांभिर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. तोपर्यंत वागंणेकर यांच्यासह निरीक्षक काटकर व त्यांचे सहकारी, देवरूखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील, संगमेश्‍वरचे पोलिस निरीक्षक महेश थिटे यांच्यासह त्यांचे सहकारी अलर्ट झाले होते. चिपळूण पोलिस देवरूखच्या दिशेने पाठलाग करत होते.

देवरूखनजीक पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना संशयितांच्या वाहनांची माहिती मिळाली आणि त्यांनी मोठ्या वाहनांची वाट न पाहता प्रसंगावधान राखत दुचाकीवरून भरधाव वेगातील संशयितांच्या वाहनांचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत संशयित संगमेश्‍वर हद्दीत पोहचले होते. त्याठिकाणी महेश थिटे यांनी सहकार्‍यांसह नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरूच ठेवली होती. त्याचवेळी संशयित पोलिसांच्या हाती लागले.