Sun, Jan 20, 2019 01:05होमपेज › Satara › लंकेश हत्या प्रकरण : पोलिसांचे सातार्‍यात सर्चिंग

लंकेश हत्या प्रकरण : पोलिसांचे सातार्‍यात सर्चिंग

Published On: Jun 17 2018 1:38AM | Last Updated: Jun 17 2018 1:38AMसातारा : प्रतिनिधी

कर्नाटक राज्यातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांनी सातार्‍यात वास्तव्य केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी प्रशिक्षणही घेतल्याचे वृत्त दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सातारा पोलिस दल खडबडून जागे झाले आहे. बंगळूर पोलिसांनी सातार्‍यात नेमकी कोठे व कोणती कारवाई केली होती?  यासाठी सातारा पोलिसांनी शनिवारी सर्चिंग ऑपरेशन सुरू होते. मात्र, या ऑपरेशनमध्ये काय झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांनी सातार्‍यात वास्तव्य केल्याचे समोर येत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येतील नेमका किती जणांनी सातार्‍यात मुक्काम केला? संशयित मारेकरी सातार्‍यात कोणाच्या ओळखीने आले होते? हत्येनंतर ते नेमके कधी आले होते? सातार्‍याशी या प्रकरणात आणखी कोणती लिंक आहे? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. याबाबत दै.‘पुढारी’ने शनिवारी वृत्त प्रसिध्द केल्यानंतर सातारा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

गौरी लंकेश यांच्या हत्येसारख्या संवेदनशील प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी सातार्‍यात एका घरावर छापा टाकून काही जणांकडे चौकशी केली होती. हे पोलिस सातार्‍यात आले असल्याची कोणतीच खबर सातारा पोलिसांकडे नव्हती. हा प्रकार दै.‘पुढारी’ने समोर आणल्यानंतर पोलिसांनी सर्चिंग ऑपरेशन करण्यास सुरूवात केली आहे. गौरी लंकेश यांच्यापूर्वी महाराष्ट्रातील अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्याने  या प्रकरणाला वेगळी किनार आहे.

त्याच पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी शनिवारी कोडोली परिसरासह शहरातील प्रमुख ठिकाणी चौकशी केली. बंगळूर पोलिस नेमके कोठे उतरले होते व कोणती कारवाई केली? याचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहे. या सर्चिंग ऑपरेशनमधून डॉ. दाभोलकर किंवा कॉ. पानसरे यांच्या खून प्रकरणातील काही धागेदोरे हाती येतात का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. दि. 29 मे रोजी हे पथक सातार्‍यात दाखल झाले होते. त्या अनुषंगाने शहरातील सीसीटीव्ही आता पोलिसांच्या रडारवर आले आहे. तसेच रेकॉर्डवरील काही संशयितांची उलटतपासणी करण्याचा विचारही आता होत आहे. शनिवारी दिवसभर हे सर्चिंग ऑपरेशन सुरू होते. मात्र, यामधील नेमकी माहिती मिळाली नाही.