Mon, Mar 25, 2019 17:35होमपेज › Satara › कराडात रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट

कराडात रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:36PMकराड : प्रतिनिधी 

येथील मुख्य बाजारपेठेत असणार्‍या चावडी चौक परिसरातील स्वप्निल रेस्टॉरंटमध्ये गॅस गळती होऊन सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात परिसरातील अन्य सात दुकानांसह चार ते पाच घरांचे नुकसान झाले. तसेच  फुटलेल्या काचा लागून एक युवकही किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, शिवजयंतीदिनी घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

चावडी चौक परिसरात व्होडाफोन स्टोअरनजीकच्या बसवेश्‍वर कॉम्पलेक्समध्ये तळमजल्यावर स्वप्निल गिरी यांच्या मालकीचे स्वप्निल रेस्टॉरंट आहे. याच ठिकाणी सकाळी सहाच्या सुमारास अचानकपणे गॅस गळती झाली. त्यानंतर काही क्षणांतच दुकानाचे शटर आणि दुकानातील काही खुर्च्या बाहेर  फेकल्या गेल्या. त्यानंतर शेजारील बहार ब्युटी पार्लर, स्वामी समर्थ दवाखाना, पार्श्‍वनाथ पतसंस्था, व्होडा फोन गॅलरी, एस. जीन्स्, क्‍वीन लेडीज पार्लर, युवा फॉर मेन्स, रियल ड्रीम्स या दुकानांचे शटर, आतील  फर्निचरसह काचा फुटल्या.

या स्फोटाचा आवाज एवढा भयावह होता की, सोमवार पेठ, कन्याशाळा, आझाद चौकासह शनिवार पेठेतील लोकांनाही याचा आवाज ऐकू आला. त्याचबरोबर स्वप्नील रेस्टॉरंटपासून सुमारे 50 मीटर अंतरावर राहणार्‍या मंथन शेंडे यांच्या घराची काच फुटून ती त्यांच्या कानाला, गालाला लागली. यावेळी झोपेत असणार्‍या मंथन शेंडे यांना काहीच कळले नाही. मात्र, रक्त येऊ लागताच त्यांनी बाहेर आवाजाच्या दिशेने डोकावून पाहिले. त्यावेळी स्वप्नील रेस्टॉरंटमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे त्यांना पहावयास मिळाले.

तोपर्यंत नगरसेवक विनायक पावसकर, सुहास जगताप यांच्यासह नागरिकही घटनास्थळी दाखल झाले होेते. तत्पूर्वीच नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांसह अग्निशमन दलास दिली होती. अग्निशमन दल दाखल होईपर्यंत रेस्टॉरंटमधील वस्तूंनी पेट घेण्यास सुरूवात केली होती. मात्र त्वरित या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश आल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्टॉरंटमधील एक रिकामी आणि दोन गॅस असलेल्या सिलेंडरच्या टाक्या, अर्धवट जळालेले काऊटंर, प्लास्टिकच्या खुर्च्या बाहेर काढल्या.

दरम्यान, तहसीलदार राजेंद्र शेळके, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनीही घटनास्थळी भेट देत सर्व परिस्थतीचा आढावा घेतला. मात्र तोपर्यंत केवळ गॅस गळतीमुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता.  सकाळी साडेदहानंतर घटनास्थळी सातार्‍याचे बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल झाले. त्यानंतर या पथकाने रेस्टॉरंटसह नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली. त्यानंतर गॅस गळतीमुळेच ही दुर्घटना घडल्याचा अहवाल या पथकाने पोलिस उपअधीक्षकांना सादर केला.

दरम्यान या घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली असून सर्व शक्यता समोर ठेऊन पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.