Sat, Mar 23, 2019 02:05होमपेज › Satara › आ. शशिकांत शिंदे : ऊर्जामंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत निर्णय

वीज जोडणीसाठी मार्चपर्यंत निधी

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:26PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी  

सातारा जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले हजारो कृषीपंप वीजजोड देण्यासाठी तसेच नवीन ट्रान्सफॉर्मर, मीटर आणि पोल बदलण्यासाठी लागणारा निधी मार्च महिन्यापर्यंत मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.

सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  वीजवितरण विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले होते. अधिक्षक अभियंत्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वीजवितरणच्या वरिष्ठ  अधिकार्‍यांच्या  उपस्थितीत  आ. शशिकांत शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती.

जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून  15 हजार शेतकर्‍यांना अनामत रक्कम भरुनही वीजजोड देण्यात आले नाहीत. जिल्ह्यात वसुलीचे प्रमाण 90 टक्क्यांवर तर वीज गळतीचे प्रमाण अत्यल्प असूनही अन्यायकारक  भारनियमन केले जात आहे. कृषीपंपांना वीज मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यात वीजवितरणकडे कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. नवीन वीजमीटर आणि ट्रान्सफॉर्मर  नाहीत, अशा तक्रारी आ. शिंदे यांनी उर्जामंत्र्यांसमोर मांडल्या. 

बैठकीत ना. बावनकुळे यांनी सरकार विजवितरणाची प्रलंबित कामे करण्यासाठी निधी देणार आहे. कॅबिनेटमधे तसा निर्णय घेण्यात येणार असल्याचे तसेच मार्चपर्यंत सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रलंबित वीजजोड देण्याचा आणि कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. जानेवारीच्या    पहिल्या आठवड्यात सातार्‍यात विज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्ह्याचा आराखडा तयार करुन उर्जामंत्र्यांकडे पाठवण्यात येणार आहे. लवकरच शेतकर्‍यांसाठी अडीच लाख नवीन वीजमीटर आणि त्याप्रमाणात लागणारे नवीन ट्रान्सफॉर्मर सरकार उपलब्ध करुन देणार असल्याचेही आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले.