Mon, Jun 24, 2019 17:12होमपेज › Satara › विद्यार्थ्यांच्या उणिवांसाठी कृतियुक्‍त कार्यक्रम 

विद्यार्थ्यांच्या उणिवांसाठी कृतियुक्‍त कार्यक्रम 

Published On: Mar 08 2018 9:12PM | Last Updated: Mar 08 2018 9:06PMसातारा : प्रतिनिधी

असर संस्थेतर्फे राज्यासह सातारा जिल्ह्यातील 14 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण केले होते. या सर्व्हेक्षणातील जिल्ह्याच्या बाबतीत धक्‍कादायक  अशी माहिती दै.‘पुढारी’ने समोर आणली. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. ‘पुढारी’च्या वृत्ताची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व्हेक्षणात संस्थेने दाखवलेल्या उणिवा दूर करण्यासाठी कृतीयुक्‍त कार्यक्रम राबवणार असल्याची ग्वाही दिली. 

दै. ‘पुढारी’ ने मंगळवारी ‘हुश्शार सातार्‍याची पोरं, व्यवहार ज्ञानात कच्ची’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द करून असर संस्थेने सर्व्हेक्षणात मांडलेले जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे समोर आणले होते.  ‘पुढारी’चे वृत्त प्रसिद्ध होताच शैक्षणिक वर्तुळासह पालकांमध्येही खळबळ उडाली. जिल्हा परिषद प्रशासनानेही या वृत्ताचे गांभीर्याने दखल घेतली.   मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी  विद्यार्थ्यांचे वाचन,  मातृभाषेचे ज्ञान,  गणित, सामान्यज्ञान, व्यवहार ज्ञान  आणि इंग्रजी  या गोष्टीवर फोकस ठेवणार असल्याचे सांगितले.  विद्यार्थ्यांमध्ये ज्या उणिवा दाखवल्या आहेत त्यावर गांभीर्याने विचार करून उपक्रम राबवण्याच्या सूचना डॉ. शिंदे यांनी केल्या आहेत. 

अहवालामध्ये व्यवहारज्ञान व बँकिंगबाबतची सांगड विद्यार्थ्यांना  घालता येत नसल्याने जिल्हा परिषदेमार्फत कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासूनच शालेय विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, प्राथमिक ज्ञान, बॅकिंग ज्ञान, सामान्यज्ञान,मातृभाषेचे वाचन, इंग्रजी वाचनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग, बँकांचे प्रतिनिधींना बरोबर घेवून  याबाबतचा अभ्यासक्रमही तयार करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक शाळांमध्ये याबाबतचे शिक्षण देण्यात येणार  असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.