Mon, Jul 22, 2019 04:42होमपेज › Satara › फरार फौजदाराला अटक

फरार फौजदाराला अटक

Published On: Aug 14 2018 1:05AM | Last Updated: Aug 14 2018 12:33AMसातारा : प्रतिनिधी

दहिवडी पोलिस ठाण्याचा फौजदार सतीश दबडे हा शुक्रवारी लाचेची रक्‍कम घेऊन पळून गेल्यानंतर अखेर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला सोमवारी ताब्यात घेऊन अटक केली.  न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. 

दहिवडी येथील बीअर बार हॉटेलच्या मालकाकडून फौजदाराने 13 हजार रुपयांची लाच मागितली होती. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीमध्ये ते स्पष्ट झाले. लाचेची रक्‍कम शुक्रवारी घेण्याचे ठरल्यानंतर सातारा एसीबीने दहिवडी पोलिस ठाण्यासमोर सापळा लावला. फौजदार सतीश दबडे याने तक्रारदार यांना 13 हजार रुपये त्याच्या कारमध्ये येवून देण्यास सांगितले.

तक्रारदार यांनी पैसे दबडे याला दिल्यानंतर त्याठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस कर्मचारी कारवाई करण्यासाठी निघाले. मात्र, फौजदार सतीश दबडे याच्या लक्षात येताच त्याने कार सुरु करुन ती दामटली. एसीबीचे पोलिस थांबण्यासाठी सांगत असतानाही तो तसाच तेथून कारमधून पळून गेला. या सर्व थरारक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. दहिवडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस शोध घेत होते. अखेर सोमवारी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात नेले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे

तक्रारदाराची दोघांविरुद्ध तक्रार..

दहिवडी पोलिस ठाण्यातील फौजदार सतीश दबडे याच्यासह आणखी एका पोलिसानेही पैशांची मागणी केली असल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तक्रारदार लालासो पोळ यांनी पोलिस मुख्यालयात अर्ज दिलेला आहे. या तक्रारीमध्ये पोलिस ठाण्यातील अधिकार्‍याला भेटल्यानंतर त्यांनी लाचेची रक्‍कम सतीश दबडे यांना देण्यास सांगितले असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. या प्रकरणाच्या चर्चेसाठी तक्रारदार पोळ हे दि. 4 ते 10 ऑगस्ट या कालावधीत वारंवार पोलिस ठाण्यात गेले आहेेत. यामुळे तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून दबडे व संबंधित अधिकार्‍याचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.