Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Satara › वाळू व्यावसायिकांकडून युवकाला मारहाण

वाळू व्यावसायिकांकडून युवकाला मारहाण

Published On: Jun 29 2018 12:00AM | Last Updated: Jun 28 2018 10:30PMपिंपोडे बुद्रुक : वार्ताहर 

तडवळे सं. वाघोली, ता. कोरेगाव येथे बुधवारी सायंकाळी युवकाला 10 ते 15 जणांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके, दगड  याच्या साहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, वाळूच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, वाळूच्या अवैध उपशातून अनेक जण माजोर झाले असून त्यातूनच गुन्हेगारी कारवाया वाढल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, भूषण भोईटे (वय 35) हे तडवळे गावचे रहिवासी आहेत. तडवळे सं. वाघोली येथून फलटण, माणसह अन्य ठिकाणांकडे वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. ही वाळू वाई, पाचगणी, महाबळेश्‍वर येथील बांधकामांनाही प्रामुख्याने जात असते. यातून अनेक जण गब्बर झाले आहेत. या अवैध वाळू वाहतुकीमुळे अनेक व्यवसायिक व दलालही तयार झाले आहेत. यातूनच  भूषण भोईटे यांचा काही वाळू व्यावसायिकांबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची चर्चा आहे.

याच कारणावरून बुधवारी दुपारी चारच्या सुमारास भूषण भोईटे यांना संदीप उर्फ दादा वाघ, सचिन मोरे (रा. कळंबे, ता. वाई) यांच्यासह दहा ते पंधरा युवकांनी तडवळे गावच्या हद्दीत असणार्‍या साई ढाब्याच्या पाठीमागील बाजूला लोखंडी रॉड, दगड, लाकडी दांडक्याच्या सहाय्याने बेदम मारहाण केली.मारहाणीत भूषण भोईटे हे जागीच बेशुद्ध पडले होते. ही माहिती तडवळे गावचे पोलीस पाटील बापू ठोंबरे  यांना कळताच त्यांनी सागर शामराव भोईटे यांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार स्टेशन येथे भूषण भोईटे यांना उपचारासाठी दाखल केले.उपचारादरम्यान भूषण भोईटे यांनी त्यांना मारहाण करणार्‍या दोघांची नावे सांगितली. यावेळी तडवळे येथील ग्रामस्थ व परिसरातील नागरिक यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार स्टेशन येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारांसाठी फलटण येथील खाजगी दवाखान्यात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि एम. बी. खेडकर यांच्याशी घटनेबाबत संपर्क साधला असता, आमच्याकडे याबाबत कोणीही रितसर तक्रार देण्यासाठी आले नसल्याचे सांगितले.