होमपेज › Satara › मुलींकडून वडिलांचे पिंडदान 

मुलींकडून वडिलांचे पिंडदान 

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 10:40PMखंडाळा - वार्ताहर 

घरातील कर्ता वडील गेल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळूनही धीर खचू न देता त्यांच्या मुलींनी अंत्यसंस्काराचे सर्व विधी स्वतः करून परंपरेला छेद दिला आहे. यामुळे समाजापुढे नवा पायंडा निर्माण केला असून काळानुसार बदलले पाहिजे, असाच संदेश सावित्रीच्या लेकींनी दिला आहे. 

सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगावपासून जवळ असणार्‍या कवठे येथे कुमार नारायण वेदपाठक (वय 42) हे मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकत होते. त्यांना पत्नी दिप्ती यांनीही शेतमजुरी करून साथ दिली. पोटी फक्त ज्ञानल आणि प्रांजल या दोन मुली. मात्र बेताची परिस्थिती आणि पडीक जमीन यामुळे कर्जाचा डोंगर झाल्याने मानसिक आजाराने कुमार यांनी दि. 15 रोजी आत्महत्या केली. डोक्यावरचं पितृछत्र हरपलं की भलेभले हतबल होतात.

परंतु, वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे सर्व विधी स्वत:च करण्याचा निर्णय दोन बहिणींनी मिळून घेतला. त्यास सर्व नातेवाईकांनीही मान्यता दिली. त्यानंतर बारावीत शिकणारी ज्ञानल आणि दहावीत शिकणारी प्रांजल उर्फ मीनल यांनी हृदयावर दगड ठेवून आत्महत्या केलेल्या वडिलांच्या पार्थिवावर सख्खे भाऊ आणि चुलते नसल्याने स्वतःच अंत्यसंस्कार, दशक्रिया, पिंडदान केले. बुधवारी नीरा नदीत अस्थि विसर्जन करून सर्व विधी आटोपून दुःख पचवत आणि घरचे काम सांभाळीत दोघींनी परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला आहे. 

इ. बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या ज्ञानलला दहावीत 90 टक्के गुण मिळाले होते तर प्रांजल दहावीत शिकत आहे. या मुलींच्या पुढील शिक्षणाची परवड होवू नये, यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे.