Tue, Jun 25, 2019 13:13होमपेज › Satara › १ ते १० जून शेतकरी संपावर; जिल्हावार नियोजन बैठका 

१ ते १० जून शेतकरी संपावर; जिल्हावार नियोजन बैठका 

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:21PMकराड : प्रतिनिधी 

देशभरात सध्या शेतमालाचे भाव पडले आहेत. केंद्रशासनाची धोरणे पूर्ण उद्योग धार्जिणी असून ही धोरणे शेतकर्‍यांच्या मुळावर उठली आहेत.  या धोरणांच्या निषेधार्थ देशभरातून 110 पेक्षा जास्त राजकारण विरहीत संघटना एकत्र आल्या आहेत. राष्ट्रीय किसान महासंघाच्या माध्यमातून त्यांनी दि.1 ते 10 जूनदरम्यान देशव्यापी शेतकरी संपाची घोषणा केली आहे.  महाराष्ट्रात होणार्‍या शेतकरी संपासाठी 120 सदस्यांची समन्वय समिती नेमण्यात आली असून डॉ. बुधाजीराव मुळीक यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. 

या शेतकरी संपाला किसान हडताल व गांव बंद आंदोलन असे संबोधित करण्यात आले असून एकूण 22 राज्यात राष्ट्रीय किसान महासंघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून या शेतकरी संपाबाबत नियोजन करण्यात येत आहे,  अशी माहिती राष्ट्रीय किसान महासंघाचे कोअर कमिटीचे सदस्य शिवकुमार कक्काजी यांनी दिली. 

सध्या देशातील शेतकर्‍यांसमोर कर्जबाजारीपणा बरोबरच शेतमालाला तोट्यातील बाजारभावाचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच देशभरातील शेतकरी संपाच्या निमित्ताने कोणत्याही राजकीय सहभागाशिवाय एक होत असून राष्ट्रीय किसान महासंघाने जाणीवपूर्वक सर्व राजकीय पक्ष व निवडणूक लढविणार्‍या शेतकरी संघटनांना या आंदोलनापासून दूर ठेवले आहे. एकाच तारखेला देशव्यापी शेतकरी संप करण्याचे उद्देश विषद करताना शेतकरी नेते जगजीतसिंह दल्लेवाला यांनी सांगितलेकी शेतकरी संपाचे स्वरूप हे दूध, भाजीपाला, फळे व अन्नधान्याचा शहरातील पुरवठा बंद ठेवण्याचे आहे.

मात्र एक दोन राज्यात हे आंदोलन केले तर त्या राज्यातील सरकारे इतर राज्यातून शेतमाल आयात करून शहरी ग्राहकांची भूक भागवीत असतात. त्यामुळेच एकाचवेळी 22 राज्यात शेतकरी संप केल्यामुळे देशातील 128 शहरामध्ये दूध, भाजीपाला, फळे व अन्नधान्याचा पुरावठा एकाच वेळी बंद होणार आहे. तसेच या शेतकरी संपामध्ये देशपातळीवरील प्रमुख 3 मागण्या आहेत, यामध्ये सरसकट सातबारा कोरा, उत्पादन खर्च अधिक दीड पट हमीभाव व कमी जमीन धारणा असणार्‍या शेतकर्‍यांना  निर्धारित हमी उत्पन्न यांचा समावेश आहे. 

शेतकरी संपादरम्यान दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नई या मेट्रो शहरासह 128 शहरामध्ये दुधाचा एक थेंबही व भाजीपाला पोहोचणार नाही अशी खबरदारी घेण्यात आली आहे. 10 दिवस चालणार्‍या या आंदोलनामध्ये 5 जून रोजी धिक्कार दिवस, 6 जून रोजी मध्य प्रदेश येथे गतवर्षी झालेल्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजली व केंद्र सरकारचे श्राद्ध, 8 जून रोजी असहकार आंदोलन, 9 जून रोजी सामूहिक उपोषण व 10 जून रोजी भारत बंद आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.