Sun, Jul 21, 2019 08:20होमपेज › Satara › स्वातंत्र्य सैनिक बाबुराव जंगम यांचे निधन

स्वातंत्र्य सैनिक बाबुराव जंगम यांचे निधन

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 10:32PMसातारा : प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे तसेच सातारा येथील शस्त्रगृहातून ब्रिटीश पोलिसांच्या हातावर तुरी देत बंदूका पळवून नेणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव जंगमगुरुजी (वय 93 , रा. समर्थनगर, देगाव फाटा, कोडोली, सातारा) यांचे शनिवारी सायंकाळी पुणे येथे निधन झाले. दरम्यान रविवारी संगम माहुली येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बाबुराव जंगम गुरुजी यांच्या निधनामुळे सातार्‍याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली. मुळचे कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील असलेल्या जंगम गुरुजींनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला वाहून घेतले होते. प्रतिसरकार चळवळ स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. क्रांतीसिंह नाना पाटील, वसंतरावदादा पाटील, किसन वीर, भि. दा. भिलारे गुरुजी, सोपानराव घोरपडे यांच्यासमवेत त्यांनी प्रति सरकारच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपला सहभाग नोंदवला होता. त्यांनी भूमिगत राहून ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले होते. 

गेले काही दिवस ते आजारीच होते. त्यांच्यावर पुणे आणि सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले होते. शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, मुलगी, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. 

शनिवारी रात्री बाबुराव जंगम यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव रविवारी काँग्रेस भवनात आणण्यात आले. सभागृहात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सातारकरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. 

आ. आनंदराव पाटील, अ‍ॅड. विजयराव कणसे, प्रल्हाद चव्हाण, जगन्नाथ देशपांडे, विजय देशपांडे, जयवंतराव केंजळे, धनश्री महाडिक, सोपान घोरपडे, विजय मांडके यांच्यासह मान्यवरांनी बाबुराव जंगम यांनी काँग्रेस कमिटीमध्ये असताना केलेल्या कार्याला उजाळा दिला. 

 

Tags : satara, satara news, Baburao Jangam, passed away,