Tue, Jul 23, 2019 04:24होमपेज › Satara › फसवणुकीच्या रकमेचा आकडा 22 लाखांवर

फसवणुकीच्या रकमेचा आकडा 22 लाखांवर

Published On: Jun 13 2018 9:15AM | Last Updated: Jun 13 2018 12:32AMकुडाळ : प्रतिनिधी

करंदी तर्फ कुडाळ, ता. जावली येथील शेतकर्‍यांच्या नावावर बोगस पीक कर्ज काढून फसवणूक करण्यात आल्याचे दै.‘पुढारी’ने उघड केल्यानंतर मेढा पोलिस ठाण्यात तक्रारींचा ओघ वाढला आहे. 3 लाखांवरून आता हा आकडा 22 लाखांवर गेला आहे. याच पद्धतीने बोगस पीक कर्ज काढून अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र बँकेच्या कुडाळ शाखेत बँक मॅनेजर व शिपायाला हाताशी धरून मंगेश भरत निकम (रा. करंदी तर्फ कुडाळ, ता. जावली) या भामट्याने नवनाथ तानाजी निकम, तानाजी यशवंत निकम (दोघेही रा. करंदी तर्फ कुडाळ), शिवाजी वामन वेदपाठक (रा. करंदी), परमेश्‍वर यशवंत जाधव (रा. आर्डे), नंदलाल कुंडलिका निकम (रा. करंदी), तानाजी महादेव निकम (रा. करंदी), प्रकाश लक्ष्मण गावडे (रा. आखेगणी), आनंद तुकाराम गंगावणे (रा. रानगेघर), जयश्री दत्तू पवार (रा. दरे बुद्रक) यांच्या नावावर बोगस पीक कर्ज काढून फसवणूक केली. या सर्वांची 22 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. या सर्व शेतकर्‍यांनी मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भामटा मंगेश निकम याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, बँकेचा मॅनेजर हा अद्याप फरार आहे. 

हा प्रकार दै.‘पुढारी’ने उघडकीस आणल्यानंतर तालुक्यातील शेतकरी खडबडून जागे झाले आहेत. आपल्याही नावे बोगस कर्ज आहे का याची पडताळणी आता सुरू झाली आहे. तसेच या प्रकरणाशी संबधित तक्रारी असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.