Mon, Mar 25, 2019 13:57होमपेज › Satara › लोणंद पालखी तळावर चार दर्शनरांगा

लोणंद पालखी तळावर चार दर्शनरांगा

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 11:08PMलोणंद : प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे शुक्रवारी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा पोलिस दलाची यंत्रणा सज्ज झाली आहे. माऊलीच्या पाळखी सोहळ्याचा गतवर्षांप्रमाणे या वर्षीही लोणंदला एकच मुक्‍काम असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर लोणंदच्या पालखी तळावर माऊलीच्या दर्शनासाठी चार दर्शन रांगाचे नियोजन केले आहे. त्यामध्ये दोन पुरुष व दोन स्त्रियासाठी स्वंतत्र रांगा केल्या आहेत. या नियोजनामुळे भाविकांची जास्त गर्दी होणार नसल्याचा विश्‍वास फलटणचे उपाधीक्षक डॉ. अभिजीत पाटील व लोणंदचे सपोनि गिरीश दिघावकर यांनी व्यक्‍त केला. 

माऊलीच्या पालखी सोहळ्याचे लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या मुक्‍कामासाठी आगामन झाल्यानंतर सुरक्षा व वाहतूकीचे नियोजन पोलिस दलाने केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पाहणी केली. पालखी सोहळा बंदोबस्तासाठी 5 पोलीस उपअधीक्षक, 11 पोलीस निरिक्षक, 60 सपोनि, 624 पोलीस जवान, 102 महिला पोलीस, 122 वाहतुक पोलिस, 350 होमगार्ड, 150 महिला होमगार्ड असा सुमारे  1200 जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लोणंद पालखी तळावर भाविकांना माऊलीच्या दर्शनासाठी दोन महिलांसाठी व दोन पुरुषांसाठी अशा चार स्वतंत्र दर्शन रांगा  तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी लोणंद गावात शास्री चौकाच्या बाजूने व खंडाळा रोड ने बिरोबा वस्तीच्या दिशेने अशा एक पुरुष व एक महिला अशा रांगा लावण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शन चांगल्या पध्दतीने मिळणार आहे. पालखी सोहळा काळात वाहतूकीचे नियमन करण्यात आले असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. तर लोणंद - तरडगाव मार्गावर चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगणाचे वेळी वाहतूकीची कोंडी होते त्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर केला जाणार आहे.

पालखी सोहळा काळात मुक्काम व गर्दीच्या ठिकाणी समाजकंटक व गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी, महिलांची छेडछाड, दागिनेचोरी करणार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस पाच अधिकारी व 50 कर्मचार्‍यांचे पथक कार्यरत राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.  त्यासाठी एसआरपीएफ, आरसीपी व क्युआरटी ची पथके नेमण्यात आली आहेत.

पालखी तळावर पादुका दर्शनासाठी स्क्रीनची सोय करण्यात आली असून सीसीटीव्ही, वॉच टॉवर उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मोठ्या क्षमतेची दुर्बिण व हत्याराने सज्ज असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी नेमणूक केली जाणार आहे. सोहळा काळात संशयास्पद बेवारस बॅगा आढळल्यास पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले  आहे.

पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच सकाळपासूनच निरा बाजूकडून लोणंदकडे वारकरी दिंडीचे ट्रक, पाण्याचे टँकर येत असतात त्यांना अडथळा येऊ नये म्हणून पाडेगावकडे जाणारी वाहतूक लोणंद येथील अहिल्यादेवी चौकात बंद करण्यात येत असते. पाडेगावला जाणारी वाहतूक विनायकराव पाटील वस्ती, पिंपरे बु॥ मार्गे व अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहे. माऊलीचा मुक्‍काम जरी लोणंदला असला तरी शहराबाहेर 15 किमी परिघात पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. पर्यायी व मुख्य रस्त्यावर लुटमारीचे प्रकार होऊ नयेत यासाठी मोबाईल पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. पालखी काळात चोर्‍या रोखण्यासाठी इतर जिल्ह्यातील गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले आहे. पालखी तळ, एसटी स्टॅन्ड, अहिल्यादेवी चौक, गांधी चौक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.