Wed, Apr 24, 2019 21:47होमपेज › Satara › हरवलेली आई सापडल्याने पुत्राचा जीव भांड्यात!

हरवलेली आई सापडल्याने पुत्राचा जीव भांड्यात!

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:31PMमायणी : वार्ताहर

मायणी-बोपोशीतील बकुळाबाई राणोजी मोकाशी या मुलगा यशवंतकडे मानखुर्दला राहत असताना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता अचानक त्या बेपत्ता झाल्याने कुटुंबियांचा धीर खचला. पण, वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात त्या असल्याची माहिती वाशी पोलीसांमार्फत मायणीतील अंकुश चव्हाण यांना समजल्यानंतर त्याने मित्रांच्या मदतीने गावाकडच्या त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती कळवली. पुन्हा मुंबईमधील त्यांच्या मुलाला त्या सुखरुप असल्याचे कळताच मुलाचा जीव भांड्यात पडला.

मायणीजवळ बोपोशी हे स्थलांतरित गाव आहे. बकुळाबाईंचा मोठा मुलगा श्रीरंग मायणीत तर नामदेव, भरत, यशवंत, बाळू ही मुले,  मुलगी शारदा व बाई ही मुंबईत राहतात. काही दिवसांपूर्वी गावी आलेल्या शारदासोबत बकुळाबाई मुंबईला गेल्या. तिच्याकडे मुक्काम करून त्या मुलगा यशवंतकडे मुक्कामास गेल्या. त्या मुंबईच्या वातावरणात रमल्या नाहीत. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता बकुळाबाई घराजवळून फेरफटका मारत असतानाच अचानक  हरवल्या. त्या मानखुर्दची ट्रेन पकडून सानपाड्यात पोहोचल्या. तिथे काही महिलांना बकुळाबाई या चुकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे महिला पोलीसांना कळविले. त्यानंतर बकुळाबाईना वाशी पोलीस मुख्यालयात पाठविण्यात आले. तिथे मुळच्या म्हसवडच्या असणार्‍या सारिका बोराटे या महिला पोलीसाने बकुळाबाईंची चौकशी करत खटाव-माण मध्ये संपर्क केला. 

वयोवृद्ध व घाबरलेल्या बकुळाबाईंना आपले नाव नीट सांगता येत नव्हते. मात्र, बोराटे यांनी आपुलकीने गावाचे नाव विचारल्यानंतर आपले गाव खटाव- मायणीजवळ असल्याचे सांगितले. ही माहिती मोबाईलव्दारे राजापूरच्या महादेव घनवट यांनी खटावच्या प्रकाश मदने यांना सांगितली. त्यांनी ती अंकुश चव्हाण यांना सांगितली. त्यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे सुभाष माळी, किरण मिसाळ यांच्या मदतीने मायणीजवळच्या  बोपोशीमधील बकुळाबाईंच्या घराचा शोध घेतला. ही माहिती मिळताच सकाळपासून मुंबईत आईच्या शोधात असणारे सर्व कुटुंबीय आनंदी झाले.