Wed, Feb 20, 2019 12:45होमपेज › Satara › महाबळेश्‍वरात माजी नगरसेवकावर गुन्हा

महाबळेश्‍वरात माजी नगरसेवकावर गुन्हा

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 11:11PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

मुंबई येथील धनिकाने पाचगणी येथील मिळकतीच्या देखभालीसाठी नेमलेल्या केअरटेकरने धनिकाच्या निधनानंतर कोणतेही अधिकार नसताना खोट्या दस्तऐवजांच्या मदतीने मार्च 2012 मध्ये जमीन विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी पाचगणी येथील एका माजी नगरसेवकासह  त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे.

याबाबत मुंबई येथील निवृत्त सहा. पोलिस आयुक्‍त अनिल वसंत सारदळ यांनी महाबळेश्‍वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. सारदळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुंबई येथील बिपीन लक्ष्मीचंद गुप्ता (मरिन ड्राइव्ह, मुंबई) हे येथे पत्नीसमवेत राहात होते. त्यांचा गेस्ट हाऊसचा व्यवसाय होता. त्यांच्या मुंबई, पाचगणी येथे मिळकती आहेत. यासंदर्भात त्यांचे व त्यांच्या बहिणीचे वाद सुरु होते. म्हणून त्यांनी दि. 20 जून 2003 रोजी स्वखुशीने मृत्यूपत्र तयार केले. मृत्यूपत्रात आपल्या पत्नीच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्याची इच्छा व्यक्त करून तसा उल्लेख केला होता, तसेच वसंत नारायण सारदळ व बेहराम अर्देशर या दोघांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. दरम्यान, पाचगणी येथील सर्व्हे नं 37 चा 11 या 93 गुंठे मिळकतीच्या देखभालीसाठी तेथीलच एका स्थानिक गॅब्रियल फर्नांडीस यांची काळजीवाहक अधिकारपत्राव्दारे नेमणूक केली. या 93 गुंठे मिळकतीचा वापर भविष्यात गरीब मुलांसाठी शाळा बांधण्यासाठी तसेच शैक्षणिक कामाकरीता व्हावा, अशी बिपीन गुप्ता यांची इच्छा होती. ही जमीन कधीच विकणार नसल्याचे ते नेहमी सांगत होते.

दि. 4 सप्टेंबर 2003 रोजी बिपीन गुप्ता यांचे निधन झाले. तेव्हा पाचगणी येथील मिळकतीबाबत गॅब्रियल फर्नांडीस यांना गुप्ता यांनी दिलेले अधिकार पत्र आपोआप रद्द होते. असे असताना फर्नांडीस यांनी बिपीन गुप्ता हयातीत असताना आपल्याला पाचगणी येथील 93 गुंठे जमीन विकण्याचे अधिकार दिल्याबाबत बनावट दस्त सादर करून दि. 3 मार्च 2012 रोजी बनावट  खरेदीखत तयार केले. यासाठी गावकामगार तलाठी, मंडल निरीक्षक, महाबळेश्वर येथील दुययम निबंधक व तहसिलदार यांनी सहकार्य केले आहे. 

मिळकतीचे खरेदीखत तयार करताना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची खातरजमा करण्याची आवश्यकता होती. मिळकतींच्या वारसांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. जमीन विक्रीसाठी जे अधिकार पत्र देण्यात आले आहे त्यावरील सह्यांची खात्री करणे आवश्यक होते. परंतु हे काहीही न करता 82 गुंठ्यांचे खरेदीखत तयार करण्यात आले. ही जमीन 1 कोटी 65 लाख रुपयांना कॅप्टन सुरेशवाला शर्मा यांना विकण्यात आली आहे. उरलेली 11 गुंठे जागेत मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. या मोबाईल कंपनीबरोबरही खोट्या कागदपत्रांच्या आधारे करारनामा तयार करण्यात आला आहे. या कामात फर्नांडीस यांनी रचलेल्या कटात बेहराम अर्देशर हेही सहभागी असल्याचा आरोप अनिल सारदळ यांनी केला आहे. 

दरम्यान, या तक्रारीनुसार महाबळेश्वर पोलिसांनी माजी नगरसेवक गॅब्रियल फर्नांडीस व त्याचा साथीदार बेहराम अर्देशर यांच्यावर कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सातारा येथील गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्‍वर पोलिसांनी दिली.