Tue, Apr 23, 2019 05:56होमपेज › Satara › भाजपकडून यशवंतराव चव्हाण यांचा द्वेष

भाजपकडून यशवंतराव चव्हाण यांचा द्वेष

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

खोट्या आश्‍वासनांमुळे जनमत विरोधात जात असल्याचे पाहून आज भाजपचे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याबाबतचे बेगडी प्रेम दिसून येत आहे. मात्र, भाजपने यशवंतराव चव्हाण यांचा नेहमीच द्वेष केला आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनास माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार,  आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कराडमधून प्रारंभ झाला. प्रारंभी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कराड प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

मोर्चानंतर कर्मवीर चौकात सभा झाली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, भाजपच्या ओठात राम आहे, मात्र पोटात नथुराम आहे. फसवी कर्जमाफी, फसव्या जाहिरातीमुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्‍वास उडाला आहे. ग्रीन लिस्ट, यलो लिस्ट, रेड लिस्ट तयार करून शेतकर्‍यांची सरकारकडून थट्टा सुरू आहे. राज्यावर 2014 पर्यंत 2 लाख 90 हजार कोटींचे कर्ज होते. मात्र, आता हे कर्ज साडेचार कोटींच्या घरात गेले आहे. दीड कोटी कर्ज वाढवून तीन वर्षात हा पैसा कोठे गेला? असा प्रश्‍न उपस्थित केला. 

सांगलीत पोलिस तरूणाचा खून करून जाळत आहेत. एक महिला पोलिस अधिकारी दीड वर्षापासून बेपत्ता झाल्याकडे लक्ष वेधत सरकार झोपले आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. काही मंत्री ज्ञान पाजळत आहेत. मंत्री लोकांना तोंड न दाखवता निघून जातात, असे सांगत आज पळपुटे सरकार सत्तेवर असल्याची घणाघाती टिकाही अजित पवार यांनी केली.

आ. जयंत पाटील यांनी आज ऑनलाईनची भाषा करणारे सरकार लोकांना प्रत्यक्ष भेटतच नाही. समस्या सोडवण्याऐवजी केवळ घोषणाबाजी केली जात आहे. वीज मंडळही सरकारमुळेच तोट्यात गेल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी आ. शशिकांत शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर टिका केली. आ. बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक करताना शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रवादीचा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.