Fri, Jun 05, 2020 12:07होमपेज › Satara › छत्रपतींच्या राजधानीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा कलगीतुरा

छत्रपतींच्या राजधानीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा कलगीतुरा

Published On: Sep 18 2019 1:44AM | Last Updated: Sep 17 2019 10:50PM

file photoसातारा : हरीष पाटणे

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात आलेल्या महाजनादेश यात्रेने सातारा जिल्ह्याचे राजकीय चित्र पुरते बदलून टाकले. वाई, सातारा, कराडात मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाच मात्र केलेल्या घोषणांची तातडीने अंमलबजावणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘काम का आदमी’ असल्याचे दाखवून दिले. 

सातारा जिल्ह्याचे नेतृत्व शरद पवारांनी केले, पृथ्वीराज चव्हाणांनी केले मात्र सातारा जिल्ह्यातील पाणी प्रकल्प पूर्णांशाने पूर्णत्वाला गेले नाहीत, सातारा जिल्ह्यात उद्योगधंदे वाढले नाहीत, सातार्‍यात मेडिकल कॉलेज निर्माण झाले नाही. सत्ता असूनही सातारा जिल्ह्याची काँग्रेस राष्ट्रवादीने अवहेलना केल्याच्या आरोपांना त्यामुळे पुष्टी मिळत गेली. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नाकर्तेपणावर बोट ठेवत सातारा जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात काहींचा स्वार्थ, काहींचा परमार्थ, काहींची राजकीय जुळणी तर काहींचा  स्वत:च्या कुलंगड्या लपवण्यासाठीचा पक्षांतर प्रपंच दिसला.

या सगळ्यात सर्वात जोरात झटका शरद पवारांना बसला  आहे तो तीन महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणुक जिंकून आलेल्या उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाने. शिवेंद्रराजे व उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा जिल्ह्यात आलेल्या महाजनादेश यात्रेत त्यामुळेच 100 हत्तींचे बळ आल्याचे वातावरण दिसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महामार्गावरून तलवारी देवून स्वागत होत होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांमध्येही वेगळा संचार दिसला. सातार्‍याच्या सैनिक स्कूलच्या मैदानावर भाजपवासी झालेल्या उदयनराजेंनी काँग्रेस- राष्ट्रवादीची  पब्लिक कंटाळेपर्यंत धुलाई केली. मात्र, सर्वाधिक हल्‍ला त्यांनी चढवला तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर. पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्यातले. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले.

मात्र, सातारा जिल्ह्यात कुठलेच प्रकल्प त्यांनी पूर्णत्वाला नेले नाहीत. एकेका कामासाठी नऊ दहावेळा हेलपाटे मारूनही त्यांनी फायलींवर सह्या केल्या नाहीत. त्यांच्या पेनमधली शाई संपली असेल म्हणून त्यांना ‘इम्पोर्टेड’ पेन भेट दिला. मात्र, त्यांनी पेन खिशालाच ठेवला. सह्या मात्र केल्याच नाहीत अशा लोकांबरोबर कशाला थांबायचे असे म्हणत उदयनराजेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर तोफ डागली. 15 वर्षे राष्ट्रवादीत थांबून आपल्यावर अन्यायच झाला. सिंचनाच्या कामात भ्रष्टाचार केलेल्यांची चौकशी करून त्यांना सजा द्या, अशी जाहीर मागणी उदयनराजेंनी केली तर शिकार करून खाणार्‍यांची आमची औलाद आहे, तुकड्यावर आमचे भागत नाही, अशा शब्दात शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीवर हल्‍ला चढवला.सातार्‍याच्या छत्रपती घराण्याचे दोन्ही राजे एवढे आक्रमक दिसले की मुख्यमंत्र्यांनाही चेव चढला.

त्यांनीही पगडी स्वीकारून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर चंपी केली. उदयनराजे व शिवेंद्रराजे आमच्याबरोबर आल्याने आता समोर कोण पैलवानच उरला नाही. कुणी तेल लावायला तयार नाही, कुणी गोद्यात उतरायला तयार नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातली अवस्थाच मांडली. छत्रपती घराण्यावर बोलाल तर जागा दाखवू असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यातील मराठा समाजाच्या काळजाला हात घातला. शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंनी भाषणात सातारच्या हद्दवाढीचा, मेडिकल कॉलेजचा, रस्त्याचा विषय काढला.

हा विषय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतानाही निघायचा पण सैनिक स्कूलच्या मैदानावर उद्याच हद्दवाढीवर सही करतो म्हणणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्याचा दिवस उजडूच दिला नाही. त्याच मध्यरात्री कराडात गेल्यावर सातारच्या हद्दवाढीला मंजूरी दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची कर्मभूमी कराड, त्या कराडात जावून त्यांचे विरोधक असलेल्या अतुल भोसले यांना ताकद देत शिवेंद्रराजे व उदयनराजेंच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी मध्यरात्री सातारच्या हद्दवाढीला मंजूरी देवून, सातार्‍याच्या रस्त्यांसाठी 50 कोटी मंजूर करण्याचा आदेश काढत आपण केवळ घोषणा करणारे मुख्यमंत्री नाही तर काम करणारे आहोत हे दाखवून दिले. 
कराडात अतुल भोसले यांच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टिकास्त्र सोडत सातारा जिल्ह्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात कोणतेही प्रकल्प पूर्णत्वाला गेले नाहीत याचे दाखले दिले.  मुख्यमंत्र्यांच्या सभेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर पृथ्वीराज  चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेवून राज्यात असलेली आर्थिक मंदी, बेरोजगारी, ठोकशाही यावर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.  त्याचवेळी उदयनराजे विकासकामांची कोणतीही फाईल घेवून आले नाहीत हे सांगायलाही ते विसरले नाहीत. देवेंद्र फडणवीस व पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील कलगी तुरा सातारा जिल्ह्यात दोन दिवस रंगला.  

मात्र, शरद पवारांच्या, पृथ्वीराजांच्या कर्मभूमीत मुख्यमंत्री फडणवीसांनी कृतीद्वारे त्यांना धोबीपछाड दिले. जी संधी सत्तेच्या काळात शरद पवारांना, पृथ्वीराज चव्हाणांना होती ती संधी त्यांना घेता आली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ती संधी साधली आणि सातारची हद्दवाढ सातारा जिल्ह्यात येवूनच फायनल केली. 

भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्‍ला असणार्‍या सातारा जिल्ह्याच्या आखाड्यात येवूून कुस्ती निकाली केली. तेल लावायला पैलवानच उरला नाही हे मुख्यमंत्री सातार्‍यात बोलले आणि कराडात जावून त्यांनी ते सिध्द करून दाखवले. आता निवडणुकीच्या आखाड्यात पवार आणि पृथ्वीराजांना आपण तेल लावलेले पैलवान आहोत हे दाखवून द्यावे लागेल, अन्यथा विधानसभेच्या निवडणुकीची कुस्तीही भाजप एकतर्फीच निकालात काढेल.