Wed, Jul 17, 2019 12:01होमपेज › Satara › शहीद संतोष महाडिक स्मारकाचा विसर

शहीद संतोष महाडिक स्मारकाचा विसर

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:41PMसातारा : प्रतिनिधी

सातारा तालुक्यातील पोगरवाडीचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कागदावर राहिले. स्मारक समितीकडून अद्यापही कोणत्याही मंजुर्‍या घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे सातारा नगरपालिकेचा 50 लाखांचा निधी दोन वर्षांपासून पडून आहे. सैनिकी सातार्‍यात शहिदांच्या वाट्याला उपेक्षा येत असल्याने तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

कुपवाडा जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. महाडिक हे सातारा तालुक्यातील पोगरवाडी गावचे सुपुत्र होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात झाले. 1998 मध्ये महाडिक लष्करात विशेष दलात दाखल झाले आणि अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना सेना पदकाने गौरवण्यात आलेे.

मात्र, या शूरवीराला वीरगती प्राप्‍त झाल्यानंतर त्याच्याच मातीतील लोकांना त्याच्या कर्तृत्वाचा विसर पडला. शहीद महाडिक शहीद झाल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांची पावले पोगरवाडीकडे वळाली. अनेकांनी महाडिक कुटुंबियांचं सांत्वन केलं. शहीद कर्नल संतोष यांच्या स्मृती जनत राहून तरुणाईला प्रोत्साहन मिळेल, असे काहीतर सुरु करण्याचा मानस त्यावेळी बोलून दाखवला गेला. शहीद कर्नल संतोष यांचं शिक्षण वायसी कॉलेजमध्ये झाल्याने या कॉलेजसमोर असलेल्या मोकळ्या जागेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. त्यासाठी 11 जणांची समिती नेमण्यात आली. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीत नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे 11 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. मात्र, तीन वर्षे होत आली तरी या समितीकडून स्मारकासाठीचा दगडही हलला नाही. अद्यापही प्राथमिक मंजुर्‍या घेण्यातच वेळकाढूपणा चालला आहे. सहाय्यक संचालक नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम (पूर्व), महावितरण यांच्याकडील परवानग्या  आल्याशिवाय या स्मारकाच्या कामास सुरुवात करता येणार नाही.

सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या या स्मारकासाठी पालिकेने गेल्यावर्षी 50 लाखांची तरतूद केली. मात्र, विविध विभागांच्या मंजुर्‍या घेण्यात दिरंगाई झाल्यामुळे हा निधी लॅप्स झाला. यावर्षी बजेटमध्ये पुन्हा 50 लाखांची तरतूद करण्यात आली.  मात्र, संबंधित विभागांकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असून  त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. संबंधित समितीमधील अधिकार्‍यांनी मनात आणलं तर चार दिवसांत अहवाल मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मात्र, अधिकार्‍यांमध्ये प्रचंड उदासिनता असल्यामुळे स्मारकाचे काम सुरु होत नाही. सातार्‍याला ऐतिहासिक तसेच सैनिकी परंपरा आहे.  मात्र, या परंपरेचे पाईक होताना प्रशासनाला मरगळ झटकावी लागेल. स्मारकाच्या विषयावरुन जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर असून तातडीने स्मारकाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.