Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Satara › सर्वपक्षीय नेत्यांची गर्जना : तालुक्याच्या प्रश्‍नासाठी दाखवली एकजूट 

वेळ आल्यावर खंडाळ्याची ताकद दाखवू

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:44PMखंडाळा : वार्ताहर    

तालुक्यातील भूमीपुत्रांनी दिलेल्या योगदानातून येथे औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. मात्र, कंपन्यांचा सीएसआर फंड तालुक्याच्या विकासाऐवजी इतरत्र नेण्याचे षडयंत्र हाणून पाडू. खंडाळा तालुक्याला कोणी वाली नाही, या भ्रमात कोणी राहू नये, वेळ आल्यानंतर खंडाळ्याची ताकद दाखवून देऊ. सीएसआर फंड तालुक्याबाहेर गेला तर जेष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा जि.प चे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी  पत्रकार परिषदेत दिला. 

जेष्ठ नेते शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे-पाटील, अनुप सुर्यवंशी, राहुल हाडके  आदी नेत्यांनी एकत्र येत रविवारी खंडाळ्याच्या प्रश्‍नावर आक्रमक भूमिका घेतली. राजकीय मतभेद बाजूला सारुन त्यांनी खंडाळ्याच्या प्रश्‍नांसाठी आग्रही मते मांडली. 

नितीन भरगुडे-पाटील म्हणाले,  खंडाळा तालुका श्रीमंत तालुका म्हणून सर्वत्र आरोळी ठोकली जात आहे . मात्र परिस्थीती वेगळीच आहे . या तालुक्यात औद्योगिक वसाहत उभी राहावी म्हणून येथील शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या . मात्र आमच्याच जागेवर उभ्या राहिलेल्या कंपन्यात स्थानिक भूमिपुत्रांना किती रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय होऊन बसला आहे. या कंपन्यांचा सामाजिक दायित्व विकास निधी स्थानिक जनता व गावांच्या विकासासाठी वापरणे गरजेचे आहे. अद्याप तालुक्यातील अनेक गावे तहानलेली आहेत. तर घाडगेवाडीला आजही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मुलभूत सुविधा देण्यासाठी सीएसआर फंडातून खर्च करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या विकासनिधीवर खंडाळ्याचा हक्क आहे. मात्र, हा निधी प्रशासनातील काही अधिकारी व लोकप्रतिनिधी अन्यत्र नेण्याचा विचार करत आहे. त्याबाबत एक बैठकही झाली असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी याला विरोध करणे गरजेचे आहे.

कंपन्यांमधील लेबर, ट्रान्सपोर्ट, हाऊस किपिंगचे ठेके तालुक्याबाहेरील लोकांना देऊन स्थानिक भूमीपुत्रांना वार्‍यावर सोडले जात आहे. स्थानिक बेरोजगार युवकांच्या हाताला काम व सीएसआर फंड तालुक्याच्याच विकास कामांसाठी वापरावा . अन्यथा तालुक्यातील सर्व गावचे सरपंच , बेरोजगार युवक व स्थानिक जनतेला बरोबर घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भरगुडे-पाटील यांनी दिला.

माजी सभापती रमेश धायगुडे म्हणाले, अहिरेच्या हद्दीत 10 कंपन्या असताना विकासकामांचे अंदाजपत्रक देऊनही कोणताच निधी मिळालेला नाही. तालुक्यातील अनेक अंगणवाड्या, शाळा खोल्या यांची अवस्था बिकट असून कंपन्यांनी या कामी मदत करावी. आनंदराव शेळके-पाटील म्हणाले, लोणंद परिसरात असणार्‍या औद्योगिक वसाहती शेतकर्‍यांच्या सहकार्याने उभ्या राहिल्या. अनेक त्रास सोसायचे तालुक्याने मात्र फायदा घेणार दुसरेच हे आता चालू देणार नाही. कंपन्यांना प्रशासन व इतरांनीही त्रास देऊ नये. आमचे सहकार्य कंपन्यांना राहणार असून कंपन्यांनी लोणंद व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी सहकार्य करावे.