Wed, Sep 18, 2019 21:12होमपेज › Satara › केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला पंढरीचा विठुराया!

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला पंढरीचा विठुराया!

Published On: Aug 24 2018 12:48AM | Last Updated: Aug 23 2018 10:31PMकराड : प्रतिनिधी

केरळ येथे आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी साक्षात पंढरपूरचा विठुराया सरसावला असून पूरग्रस्तांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून 25 लाख रुपयांचा मदतनिधी देणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी केली.

निसर्ग संपन्नतेने नटलेल्या केरळला महापुराचा फटका बसल्याने शेकडो लोकांचा बळी गेला आहे. या पुरामुळे सुमारे 46 हजार हेक्टरवरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. शिवाय, 1 हजार 700 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. केरळ राज्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारच्या माध्यमातून केरळसाठी भरीव निधी दिला आहे.

याच पार्श्‍वभूमीवर पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केरळ पूरग्रस्तांसाठी 25 लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 2 दिवसांमध्ये त्याबाबतच्या वैधानिक गोष्टींची पूर्तता करून हा निधी केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.