Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Satara › मराठा आरक्षणासाठी माणमधील ३ पं. स. सदस्यांचे राजीनामे

मराठा आरक्षणासाठी माणमधील ३ पं. स. सदस्यांचे राजीनामे

Published On: Jul 30 2018 1:32AM | Last Updated: Jul 29 2018 11:27PMदहिवडी : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांच्या राजीनाम्याची मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी केली असून आत्तापर्यंत 6 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर रविवारी माण पंचायत समितीतील 3 सदस्यांनी आपले राजीनामे दिले. यापूर्वी जि.प. सदस्या सौ. भारती पोळ यांनीही राजीनामा दिला होता. 

58 मूक मोर्चे काढल्यानंतरही शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील आंदोलनात काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतली होती. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता. जर आरक्षण देता येत नसेल तर आमदारांनी राजीनामे द्यावेत, असा पवित्रा घेतला आहे. त्यानुसार 6 आमदारांनी राजीनामे दिले आहे. सातारा जिल्ह्यात जि.प. सदस्या सौ. भारती पोळ यांनी प्रथम आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आरक्षणाला आपला पाठिंबा दशर्वला.

त्यानंतर रविवारी माण पंचायत समितीमधील राष्ट्रवादीचे तानाजी कट्टे, विजयकुमार मगर व सविता जगदाळे या सदस्यांनी आपले राजीनामे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे सुपूर्द केले आहे. यामुळे आरक्षणासाठी राजीनामासत्र सुरू झाले असून मराठ्यांच्या आरक्षणासाठी अजून कोण कोण आपल्या पदाचा त्याग करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.