Sun, Mar 24, 2019 23:55
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › खंबाटकीतील वळण हटवण्यासाठी पाठपुरावा सुरुच : खा. उदयनराजे 

खंबाटकीतील वळण हटवण्यासाठी पाठपुरावा सुरुच : खा. उदयनराजे 

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:28PMसातारा : प्रतिनिधी

पुणे-बेंगलोर महामार्गावर खंबाटकी घाटाच्या पुढे असणार्‍या एस कॉर्नरने आजवर शेकडो बळी घेतले आहे. हे वळण काढून या ठिकाणी दुसरा बोगदा करण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. मात्र, तरीही हे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर बोगद्याचे काम सुरू होणार? असा उद्विग्‍न सवाल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. 

त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, याच ठिकाणी माझे सहकारी अविनाश धायगुडे यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी झालेल्या अपघातात 18 व्यक्‍ती दगावल्याने मन विषन्‍न झाले आहे. एक लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही या दुर्दैवी कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत.  या ठिकाणची अपघातास कारणीभूत होणारी अपघात प्रवण वळणे हटवण्याबाबत अनेकवेळा वाहतूक मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.

गेल्या 7-8 वर्षांत सर्व मंत्र्यांना याची वस्तुस्थिती पटवून देण्यात आली आहे. त्यानंतर बोगद्याला मंजुरीही मिळाली असुन बोगद्याची निविदा प्रक्रिया राबवली आहे. भूसंपादनाची कार्यवाही सुरू असून अपघात होऊ नये यासाठी हे काम जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. धोकादायक वळणे शक्य तितक्या लवकर काढली पाहिजे, अशी अपेक्षा पत्रकात व्यक्‍त करण्यात आली आहे. 

 

Tags : satara, satara news, Khambatki turn, removal, Follow up, Udayanraje Bhosale,