Wed, Jun 26, 2019 18:22होमपेज › Satara › बांधकाम, शिक्षणावर जिल्हा परिषदेचा भर 

बांधकाम, शिक्षणावर जिल्हा परिषदेचा भर 

Published On: Mar 21 2018 11:22PM | Last Updated: Mar 21 2018 11:15PM सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत सीसीटीव्ही, राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंना अर्थसाहाय्य, जलसंधारणासह सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, ओपन जीमसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून  जिल्हा परिषदेच्या सन 2018 व 19 च्या  29 कोटी 98 लाख रुपयांच्या अर्थसंकल्पास जिल्हा परिषद सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार यांनी सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करताना बांधकाम, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, लघुपाटबंधारे, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण यासह विविध विभागांवर विशेष भर दिला आहे. राजेश पवार म्हणाले, सातारा जि.प. ही महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतामध्ये विकासाच्या व विधायक कार्याच्या दृष्टीने अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. सन 2018 व 19 चे  जि. प. स्वनिधीच्या मूळ अंदाजपत्रकात अपेक्षित महसुली उत्पन्न 29 कोटी 99 लाख गृहीत धरण्यात आले असून त्यापैकी 29 कोटी 98 लाख रुपये महसुली खर्चाचे अंदाजपत्रक आहे. जि.प. चे मुळ अंदाजपत्रक 61कोटी 56 लाख रुपये शिलकीचे सादर करण्यात आले. सामान्य प्रशासनसाठी 2 कोटी 50लाख  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षण विभाग हा जि.प.चा मोठा विभाग असून ग्रामीण जनतेचा  विकासाचा कणा आहे. त्यामुळे 2 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याबरोबरच शाळाप्रवेश दिन साजरा करणे, प्रत्येक केंद्रशाळेत ओपन जीम सुरू करणे, राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य या योजना नव्याने घेण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागासाठी 5 कोटी 51 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लघुपाटबंधारे विभागासाठी 90 लाख रुपये, आरोग्य विभागासाठी 80 लाख रुपये, कृषी विभागासाठी 1 कोटी 20 लाख रुपये, पशुसंवर्धन विभागासाठी 45 लाख रुपये, समाजकल्याण विभागासाठी 2 कोटी 43 लाख 49 हजार रुपये, सामान्य 11 कोटी 46 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नात वाढ होण्यासाठी  जिल्हा परिषद व पंचायत समिती येथे बँक ए.टी.एम.ची सुविधा करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.  शहीद जवानांच्या  वारसास मदत करणे व त्यांच्या पाल्यांना बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्थसहाय्य देणे ही विशेष योजना नव्याने घेतली असल्याचे राजेश पवार  यांनी सांगितले. महिला व बालकल्याण विभागासाठी 1 कोटी 21 लाख 74 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प 5 लाख रुपये,  ग्रामीण पाणी पुरवठा 47 लाख 99 हजार रुपये, जिल्हा परिषद मुद्रणालयासाठी 3 कोटी 6 लाख 61 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Tag : Construction, Education, Satara Zilla Parishad, Zilla Parishad Agenda