Wed, Jun 26, 2019 12:01होमपेज › Satara › सुरूरचा उड्डाणपूल कोसळणार तर नाही ना?

सुरूरचा उड्डाणपूल कोसळणार तर नाही ना?

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:25PMओझर्डे : दौलतराव पिसाळ

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही उड्डाणपुलांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुलाला भगदाड पडण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. पूलाची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत 10 वेळा भगदाड पडल्याच्या घटना झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणी महामार्गावर ठिगळं लावून वाहतूक सुरू आहे. वारंवार अशा घटना घडल्याने पूल ढासळून जिवीत हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सुरुर. ता वाई गावाच्या मध्य भागातून राष्ट्रीय महार्मााच्या दोन गेल्या आहेत. सुरूरमध्ये मोठा चौक असून त्या चौकातून महाबळेश्‍वरला जाणारा रस्ता आहे. ज्यावेळी चौकात उड्डाणपुल नव्हता त्यामुळे हे एक अपघाताचे केंद्रच बनले होते. त्यामुळे पूर्वेच्या बाजूला असणार्‍या शेतकर्‍यांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागत होते. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. त्यामुळे सुरूर ग्रामस्थ व पोलिसांमध्ये या विषयावर सभा होऊन त्यामध्ये चौकात उड्डाणपुल करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सुरूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर 2000 साली उड्डाणपुल मंजूर झाला. 

या पुलाचे टेंडर बी. जे शिर्के कंपनीला देण्यात आले. मात्र, काम परवडत नसल्याने कंपनीने 2002 साली काम अर्धवट सोडले. हे काम तब्बल 5 वर्ष काम रखडले होते. त्यानंतर कराडमधील आर्टा कंपनीने हे काम घेतले. पुन्हा काम सुरु झाले कामाच्या ठिकाणी लाखो रुपयांचे मटेरियल येऊन पडले. पण या कामावर नेमणुकीस असणार्‍या अभियंत्याने पुलाच्या कामासाठी असलेले साहित्यच विकून टाकले. याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी याची तक्रार महामार्ग विकास प्राधिकरणाकडे केली. मात्र, संबधित अभियंता व अधिकार्‍यांची टक्केवारी ठरल्यामुळे अधिकार्‍यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यानंतर जसे साहित्य येईल असे काम उरकण्यात आले. अवघ्या वर्षभराच्या कालावधीतच हा पुल तयार करण्यात आल्यानेच हा पुल निकृष्ट दर्जाचा झाला आहे. 

पुलाच्या मजबुतीकरणाबाबत क्‍वालिटी कंट्रोलचे प्रमाणपत्र न घेताच यावरून वाहतूक सुरू करण्यात आली. यानंतर 2008 साली हा पूल वाहतूकीसाठी सुरू करण्यात आला. वाहतूक सुरू झाल्यानंतर काही महिन्यांमध्येच पुलाला वाहनांचा भार आणि बसणार्‍या हादर्‍यांनी पूल खिळखिळा झाला. त्यामुळेच  10 वेळा या पुलाला भगदाड पडले आहे. या भगदांडांमुळे अनेक वाहनांची चाके अडकून अपघात झाले आहेत. याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी पुलाची पाहणी करून वाहतूकीस पूल बंद करण्याच्या सूचना दिल्या. यानंतरही येथील वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे हा पूल कोणत्याही क्षणी ढासळ्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. 

याचबरोबर पुणे-सातारा लेनवरील उड्डाणपुलाचे काम आयटीडीसी कंपनीला देण्यात आले. या कंपनीनेही निकृष्ट दर्जाचे काम केल्याने याही पुलाची अवस्था तशीच आहे. वाहनांच्या हादर्‍याने नवीन पुलालाही हादरे बसून भगदाडे पडू लागली आहे. या बांधकामावर कोणाचाच अंकुश नाही. सुरुरच्या दोन्ही पुलांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने हे पूल केव्हाही ढासळून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे जिवीतहानी झाल्यानंतरच सरकारला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.