Sun, Nov 18, 2018 18:07होमपेज › Satara › मारहाणप्रकरणी पाच जणांना एक वर्ष सक्‍त मजुरी, दंडाची शिक्षा

मारहाणप्रकरणी पाच जणांना एक वर्ष सक्‍त मजुरी, दंडाची शिक्षा

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 10:14PMवडूज : वार्ताहर

शिंगाडवाडी, ता. खटाव येथे बेकायदेशीर जमाव जमवून महिला व तिच्या मुलीस त्यांच्या घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी वडूज येथील प्रथम न्यायदंडाधिकारी डी. एम. झाटे यांनी पाच आरोपींना एक वर्ष सक्‍तमजुरी व वीस हजार दंडाची शिक्षा ठोठावली. 

शिंगाडवाडी येथे 23 नोव्हेंबर 2015 रोजी बेकायदेशीर जमाव जमवून महिला व तिच्या मुलीस त्यांच्या घरात घुसून यातील आरोपी रोहिदास खरात याच्याबरोबर लग्‍न लावून देत नसल्याच्या कारणावरून चिडून जाऊन मारहाण केल्याप्रकरणी नीलेश दिलीप शिंगाडे, दिलीप दामोदर शिंगाडे, नाना आनंदा खरात, आनंदा देवबा खरात व रोहिदास आनंदा खरात सर्व रा. शिंगाडवाडी, ता. खटाव यांच्याविरोधात वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु होती. 

या खटल्यामध्ये न्यायालयाने नमूद पाचही आरोपींना प्रत्येकी एक वर्ष सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या एकूण रक्कमेपैकी 8 हजार रुपये पिडीत महिला व तिच्या मुलीस देण्याबाबत न्यायालयाने आदेश दिले. 

अभियोग पक्षातर्फे अभिजित गोपलकर, सहा. सहकारी अभियोक्ता यांनी युक्तीवाद केला होता. या खटल्यातील साक्षीपुरावा, सरकारी अभियोक्त्यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून वडूज न्यायालयाने आरोपींना वरिल शिक्षा सुनावली.