Wed, Jun 03, 2020 18:12होमपेज › Satara › सीएससह कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा?

सीएससह कर्मचार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा?

Published On: Sep 12 2019 1:52AM | Last Updated: Sep 11 2019 11:45PM
सातारा : प्रतिनिधी

लाच प्रकरणात जिल्हा रूग्णालय सध्या चर्चेत आहेच. त्यात आता नव्या वादाची भर पडली आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमोद गडीकर यांच्या दुर्लक्षामुळे काही वैद्यकीय अधिकारी व सफाई कर्मचार्‍यांच्या पदावर पुणेकरांची वर्णी लावण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत. यापैकी पुणेकर कर्मचारी हे दर शनिवारी आणि रविवारी पुणे वारी करत असल्याने स्थानिक डॉक्टर व कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढत आहे. यामध्ये सीएसचाही समावेश असल्याची माहिती आहे. 

बाहेरून जिल्ह्यात सेवेला आलेले वैद्यकीय अधिकारी व सफाई कर्मचार्‍यांच्या कामाची अजब पद्धतीची आणखी भर पडली आहे. जिल्हा रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगारांची 54 पदे मंजूर आहेत. परंतु, नव्याने भरती न झाल्याने यातील अनेक पदे रिक्त होती. त्यामुळे सहाजिकच रुग्णालयाच्या स्वच्छतेवर परिणाम होत होता. रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी कंत्राटी तत्त्वावर पदे भरली होती. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेत चांगलीच सुधारणा झाली होती. परंतु, त्यांच्यानंतर ही पदे कमी करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवर पुन्हा परिणाम होऊ लागला. त्यानंतर चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांची सुमारे 25 पदे पुण्यावरून बदलीने भरण्यात आली. परंतु, त्यांच्याकडे योग्य पद्धतीने काम करून घेण्याचे काम रुग्णालय प्रशासनाकडे होत 
नाही.

या कर्मचार्‍यांपैकी अनेकजण दोन-तीन महिने गैरहजर असतात. न सांगताच अनेक दांड्या मारत असतात. त्याचबरोबर शनिवार व रविवार हे तर त्यांना त्यांच्या हक्काचेच दिवस वाटू लागले आहेत. वरिष्ठांना न सांगताच ते या दिवशी दांडी मारत असतात. त्यामुळे रुग्णालयातील स्वच्छतेची व्यवस्था ठेवायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच काहींना टोकायचे म्हटले तर, शनिवार व रविवार सुट्या घेणार्‍या वरिष्ठांकडेच ते बोट दाखतात. वरिष्ठांकडून त्यांच्याबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे आहे त्या कर्मचार्‍यांमध्ये पूर्ण क्षमतेने काम होत नाही. परिणामी रुग्णालयात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. त्याचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. 

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांबरोबर बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्‍या वैद्यकीय अधिकारी व एनएचआरएमचे तज्ञांनाही पाच दिवसांचाच आठवडा वाटत आहे. प्रशासनाला कल्पना न देताच हे रजेवर असतात. त्यामुळे आठवड्याचे शेवटचे दोन दिवस जिल्हा रुग्णालयातील एकंदर कामकाज पूर्णत: विस्कळीत होते. रुग्णालयाच्या कामाचा उडत असलेला बोजवारा थांबविण्यासाठी दांडी बहाद्दरांवर कठोर कारवाईची अपेक्षा आहे.