Wed, Sep 18, 2019 10:37होमपेज › Satara › चांदोबाचा लिंब येथे आज पहिले उभे रिंगण

चांदोबाचा लिंब येथे आज पहिले उभे रिंगण

Published On: Jul 13 2018 8:43PM | Last Updated: Jul 13 2018 8:42PMफलटण : यशवंत खलाटे

याची देही याची डोळा, 
येईल आज तरडगाव गावी
वैष्णवांचा मेळा, 
सर्वांनी पहावा डोळे भरूनी हा संपूर्ण सोहळा... 

लोणंद नगरीतून संत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊलींचा सोहळा मुक्‍काम आटोपून आज फलटण तालुक्यातील पाहिल्या मुक्‍कामी येत असून प्रतिवर्षाप्रमाणे सरदेच्या ओढ्यात त्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक- निंबाळकर, उपसभापती भगवानराव होळकर, पंचायत समिती सभापती सौ. रेश्माताई भोसले, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर, पंचायत समिती सदस्या सौ.विमलताई गायकवाड, प्रांत संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, पोलिस निरीक्षक सजन हंकारे, नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे आदी मान्यवर स्वागत करणार आहेत. दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळ्याच्या आषाढी वारीतील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब तरडगाव (ता. फलटण)  येथे शनिवार 14 रोजी सायंकाळी होत असून त्यानंतर सोहळा तरडगावकडे मार्गस्थ होईल. 

तरडगावच्या वेशीवर आ. दीपक चव्हाण, सौ. विमलताई गायकवाड, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन यांच्यासह पांडुरंग आणि माऊली भक्‍त, तरडगाव ग्रामस्थ माऊलींचे स्वागत करतील. त्यानंतर परंपरागत पद्धतीने पालखी रथातून काढून खांद्यावर घेऊन गावातील पालखी मार्गावरुन पालखी तळाकडे जाणार आहे. त्यापूर्वी गावात 2 ठिकाणी माऊलींची आरती होईल. माऊलींच्या स्वागतासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छता, रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच पालखी तळाचे सुशोभीकरण केले आहे. त्याचबरोबर वीज, पाणी, आरोग्य, रस्ते, सुरक्षितता याची व्यवस्था करण्यात आली आहे.

फलटण तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गाढवे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कापडगाव, चव्हाणवाडी, काळज, खराडेवाडी येथील गाव कामगार पोलिस पाटील यांच्या प्रयत्नाने ग्रामसुरक्षा दल आणि पोलिस मित्र संघटनेच्या सदस्यांना  टी शर्ट वाटप करण्यात आले. यावेळी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी टिके, सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, गिरीश दिघावकर उपस्थित होते. ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून पालखी सोहळा बंदोबस्तासाठी मदत होणार आहे. इतर वेळी ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून गावातील चोर्‍या, गुन्हेगारीचे नियंत्रणही केले जाणार आहे.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex