Sat, Mar 23, 2019 02:12होमपेज › Satara › कासवर पोलिस अधिकार्‍याकडून हवेत गोळीबार

कासवर पोलिस अधिकार्‍याकडून हवेत गोळीबार

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

अकलूज येथील एका पोलीस अधिकार्‍याने रविवारी रात्री कास पठारावर हवेत गोळीबार केला असून आपल्यावरही बंदूक रोखल्याची तक्रार सातारा पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण यांनी केली असून आपण असे कोणतेही कृत्य केले नसल्याचे त्या पोलीस अधिकार्‍याचे म्हणणे आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण हे आपल्या काही मित्रांसमवेत कास पठाराकडे गेले होते. रात्री 7.30 च्या दरम्यान ते सातार्‍यात परतत असताना घाटाईमार्गे येत होते. त्यांना एक स्विफ्ट कार (क्रमांक एम. एच. 45 एन. 8889) पठारावर दिसली. या गाडीमध्ये 3 पुरूष व 1 महिला होती. त्यातील एक जण हवेत गोळीबार करत होता. यावेळी चव्हाण यांनी त्यांची गाडी थांबवून संबधित व्यक्तिला गोळीबार करू नका असे सांगितले.

या कारणावरून चव्हाण व संबधित व्यक्तिची वादावादी झाली. यावरून संबधित व्यक्तीने चव्हाण यांच्यावर बंदूक रोखली. या घटनेची माहिती चव्हाण यांच्या मित्रांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांना मोबाईलवरुन दिली. यानंतर पाटील यांनी तात्काळ सातारा शहर व परिसरातील रस्त्यांची नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. रात्री 8.30 वाजता नाकाबंदीमध्ये ती स्विफ्ट गाडी निदर्शनास आली. या गाडीमध्ये अकलूज पोलिस दलातील अधिकारी असल्याची माहिती समोर आहे.  

त्यांच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली. त्यावेळी हवेत गोळीबार केला नाही आणि कोणावरही बंदूक रोखली नसल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. याउलट चव्हाण व त्यांचे मित्र हे कास परिसरात मद्य प्राशन करून हुल्लडबाजी करत असल्याचे त्या अधिकार्‍याचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे पूर्ण पोलिस यंत्रणा वेठीस धरली गेली. सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे यांनी लक्ष घालून याप्रकरणी तपास सुरु केला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आशुतोष चव्हाण व त्यांचे मित्र आणि संबंधित अकलूज पोलिस दलातील अधिकारी आणि सहकार्‍यांना रात्री उशिरा सातारा तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.