Mon, Jun 24, 2019 17:25होमपेज › Satara › कोयना विभागात बंदुकीचे बार

कोयना विभागात बंदुकीचे बार

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:23PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

कोयना वन व वन्यजीव विभागात सध्या रात्रीच्या वेळी बंदुकीचे बार उडत आहेत. शिवाय विजेच्या तारांवर आकडे टाकून वन्य प्राण्यांच्या शिकारीचे  प्रयत्न होत आहेत. विजेचे ट्रीपिंग वाढल्याने स्थानिकांसह वीज कर्मचारी व अधिकारीही वैतागले आहेत. याची संबंधित विभागांनी गांभिर्याने दखल घेऊन प्राण्यांवर बार टाकणार्‍या आणि सापळे लावणार्‍या शिकार्‍यांना कायदेशीर सापळ्यात अडकवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  

यापूर्वीही कोयना विभागात  संगमनगर  (धक्‍का) पुलाच्या दक्षिणेकडील गावात रात्रीच्या वेळी विजेच्या तारांवर आकडे टाकून शॉक देऊन वन्यप्राण्यांच्या शिकारीचा फंडा चालू होता. यासाठी स्थानिकांच्या 
मदतीने परजिल्ह्यातील रॅकेट सक्रीय झाल्याच्या चर्चा होत्या. याबाबत शासकीय बैठकात वीज कंपनीने दुजोराही दिला होता. मात्र वरिष्ठ पातळीवरून हे आरोप खोडून काढले आणि त्याचकाळात खात्यांतर्गत याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले होते. 

त्यानंतर काही काळ स्थानिक अधिकारी, कर्मचार्‍यांनी सतर्कता बाळगली. मात्र,  पुन्हा या विभागातील शिकार्‍यांनी डोके वर काढले आहे. या विभागात कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प, बफर झोन व कोअर झोन, कॉरीडॉर समाविष्ट असल्याने वन व वन्यजीव विभागाने 24 तास सतर्क रहाणे गरजेचे आहे. परंतु सध्या याच विभागात रात्रीच्या वेळी अनेकदा बंदूकीतून गोळ्या झाडल्याचे आवाज होत आहेत. तर संगमनगर दक्षिणेकडील गावात पुन्हा विजेच्या तारांवर आकडे टाकून वन्यजीवांच्या शिकारींचा प्रयत्न होऊ लागल्याने मग सातत्याने वीज ट्रीपिंग होऊन वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

कायदे, जाचक अटी व निर्बंध लावून सामान्य जनतेला मेटाकुटीस आणणारा वन्य जीव विभाग प्राण्यांच्या शिकारीबाबत गप्प का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दुर्दैवाने यामध्ये दुर्घटना घडल्यास संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी होत आहे.