होमपेज › Satara › ढाकणीचे ग्रामपंचायत कार्यालय खाक

ढाकणीचे ग्रामपंचायत कार्यालय खाक

Published On: Dec 30 2017 12:36AM | Last Updated: Dec 29 2017 10:28PM

बुकमार्क करा
म्हसवड : प्रतिनिधी

ढाकणी (ता. माण) येथे गुरुवारी रात्री अचानक विद्युत दाब कमी-जास्त झाल्याने शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 4.75 लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार उपसरपंच कृष्णात खाडे यांनी पोलिसांत केली आहे. 

ढाकणी येथे दि. 28 रोजी रात्री अचानक विजेचा दाब कमी-अधिक झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयात शॉर्टसर्किट झाले. यामुळे आग लागून संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले. दरम्यान, गावातही काहींचे टीव्ही संच जळाले. ग्रामपंचायत कार्यालयातील कॉम्प्युटर, की-बोर्ड, माऊस, प्रिंटर, एक वेब कॅमेरा, एक टेबल, जॉब कार्ड,  त्याची नोंदवही, नरेगा मस्टर एम. बी, नमुना क्रमांक एक फाईल, 2 ते 10 नमुना नं. 8 कॉम्प्युटर प्रिंट, एक अर्ज फाईल, बी.बी.एन.एल.ब्रॉ बॅन्ड नवीन कनेक्शन संच पूर्ण, फाईल वर्क ऑर्डर्स फाईल, प्रधानमंत्री आवास योजना रजिस्टर फाईल (प्रस्ताव) तसेच कार्यालयातील कपाट, खुर्च्या इतर साहित्य जळून खाक झाले असून सुमारे 4.75 लाखांचे नुकसान झाले आहे.

ग्रामपंचायत कार्यालय शाळेच्या जवळ आहे. याच्या आसपास घरे नसल्याने इतर कुठलीही हानी झाली नाही. घटनेची माहिती समजताच तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी जे. डी. शेलार, सरपंच रुपाली खाडे, ग्रामविस्तार अधिकारी मोरे, सर्कल अहिवले, ग्रामसेवक महेश ताम्हाणे, सपोनि मालोजीराव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. बीट हवालदार ए. एम. कांबळे, एस. एस. सानप, नितीन धुमाळ हवालदार खाडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.   बीट हवालदार कांबळे तपास करत आहेत.