Sat, Nov 17, 2018 03:43होमपेज › Satara › अजिंक्यतारा किल्ला होरपळला

अजिंक्यतारा किल्ला होरपळला

Published On: Apr 09 2018 1:30AM | Last Updated: Apr 08 2018 9:14PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरालगत असलेल्या किल्ले अजिंक्यतार्‍याला वणवा लागण्याचे प्रकार  दिवसेंदिवस  वाढू लागले  आहेत. शनिवारी रात्री अज्ञात समाजकंटकाकडून  या किल्ल्यावर  वणवा लावण्यात आला. या वणव्याची तीव्रता भीषण होती. त्यामुळे शेकडो वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले. पर्यावरणप्रेमींसह निसर्गप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

अजिंक्यतारा किल्ला  व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा असून दुर्मिळ झाडेही आहेत. तसेच पशुपक्ष्यांचा अधिवासही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र,  गेल्या 2 महिन्यात अजिंक्यतारा किल्ला  व परिसरात वारंवार वणवा लागण्याचे प्रकार घडत आहेत. शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास  काही समाजकंटकांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर वणवा लावला. तसेच जोरदार वारे असल्यामुळे या वणव्याने रौद्ररूप धारण केले. याबाबतची माहिती सातारा पालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर तात्काळ पालिकेला अग्निशमन बंब अजिंक्यतारा किल्ल्यावर रवाना होऊन पालिकेचे कर्मचारी व पर्यावरणप्रेमींनी हा वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.

या वणव्याची धग माची पेठ, शाहूनगर, कुरणेश्‍वर परिसर, बोगदा परिसरातील घरांना बसली आहे. या आगीत गवतासह हजारो वृक्ष जळून खाक झाले. तसेच मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट झाली. या वणव्यामुळे अजिंक्यतारा किल्ला परिसर काळाकुट्ट झाला होता. तसेच धुराचे लोटच्या लोट निर्माण झाले  होते. काही पर्यावरणप्रेमी नागरिकांसह वनविभागाच्या 10 कर्मचार्‍यांचे पथक  वणवा लागल्याच्या क्षेत्रात गेले. या कर्मचार्‍यांनी झाडांच्या डहाळ्यांच्या सहाय्याने वणवा विझवण्याचा प्रयत्न केला मात्र  आगीची तीव्रता अधिक असल्याने आग आटोक्यात आणताना  अडचणी येत होत्या. वनविभागाने याबाबत डोंगरपरिसरात राहणार्‍या नागरिकांची जनजागृती करणे आवश्यक आहे. वणवा बचाव मोहीम गावोगावी राबवली तरच वनसंपदा वाचणार आहे.

 

Tags : satara, satara news, Ajinkyatara Fort, Fire,