Sun, May 19, 2019 11:58
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › कळंबीत दोन घरांना आग; तेरा लाखांचे नुकसान

कळंबीत दोन घरांना आग; तेरा लाखांचे नुकसान

Published On: Feb 12 2019 1:09AM | Last Updated: Feb 11 2019 9:17PM
औंध : वार्ताहर

कळंबी, ता.खटाव येथे अचानक लागलेल्या आगीत दोन कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य झळून खाक झाले. ही आग रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लागली असून शॉर्टसर्किटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत सुमारे 13 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

कळंबी येथील परशुराम शंकर अडसुळे, मारुती जगन्नाथ अडसुळे, राजेंद्र विठ्ठल असडसुळे यांच्या कुटुंबातील सदस्य रविवारी शेतात गेले होते. त्यांच्या घरांना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती कळताच अडसुळे कुटुंबियांना घराकडे धाव घेतली. आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येईपर्यंत आगीने रुद्रावतार धारण केला होता. या आगीत अडसुळे कुटुंबियांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

या आगीत परशुराम अडसुळे यांचे 4 लाख 76 हजार, मारुती जगन्नाथ अडसुळे यांचे 4 लाख 75 हजार व राजेंद्र विठ्ठल अडसुळे यांचे 2 लाख  10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच येथील दुसर्‍या ठिकाणी लागलेल्या आगीत सुभद्रा लालासो सूर्यवंशी यांच्या घरातील 1 लाख 17 हजारांचा संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दोन्ही घटनेत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ही आग विझवण्यासाठी कळंबी ग्रामस्थ, युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच ग्रीन पॉवर शुगर्सचा अग्निशमन बंबांनाही प्राचारण करण्यात आले होते. सोमवारी घटनास्थळास भेट देवून मंडलाधिकारी मोहिते, तलाठी बी.टी.जगताप यांनी पंचनामा केला.