Thu, Nov 15, 2018 11:37होमपेज › Satara › तारळे येथे आग; १० लाखांचे नुकसान

तारळे येथे आग; १० लाखांचे नुकसान

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:43PMतारळे : वार्ताहर

फोटो स्टुडिओ दुकानाला लागलेल्या आगीत दुकान जळून खाक झाले. यामध्ये महागडे कॅमेरे, फोटो स्टुडिओचे साहित्य, झेरॉक्स मशीन, कॉम्प्युटर, ग्राहक सेवा केंद्राची कागदपत्रे, फर्निचर व इतर साहित्य आगीत जळाले आहे. तारळे (ता. पाटण) येथे गुरुवार दि. 25 रोजी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये अंदाजे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीची झळ शेजारच्या दुकानालाही बसली असून शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तारळे-घोट रस्त्यावर विजय बापूराव सपकाळ (रा. डफळवाडी, ता.पाटण) यांचे केदारनाथ फोटो स्टुडिओ नावाचे दुकान आहे. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक सेवा केंद्र, झेरॉक्स, लॅमिनेशन मशीन आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी दुकान उघडले. त्यानंतर ते 10.45 च्या सुमारास दुकानाचे शटर ओढून बँकेत गेले. त्यानंतर काही वेळातच दुकानातून धूर येत असल्याचे काही लोकांना दिसले.

त्यामुळे काहींनी सपकाळ व वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास याची माहिती दिली, तर काही युवकांनी शटर उघडले. तोपर्यंत संपूर्ण दुकानाने पेट घेतला होता. त्याचदरम्यान वीजपुरवठा खंडित केल्याने आजुबाजूला बोअर असूनही त्याचा उपयोग झाला नाही. यावेळी युवक व ग्रामस्थांनी दिसेल त्या घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तलाठी धनंजय भोसले यांनी आगीचा पंचनामा केला.