Thu, Jun 20, 2019 01:30होमपेज › Satara › शिरवळमध्ये गोळीबार; वाईनशॉपचालक बचावला

शिरवळमध्ये गोळीबार; वाईनशॉपचालक बचावला

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 11:09PMखंडाळा : वार्ताहर

शिरवळ,  ता. खंडाळा  येथील वाईन शॉप चालकावर शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताकडून गोळी झाडण्यात आली. मात्र, नेम चुकल्याने  वॉईनशॉप चालक बचावला. या घटनेमुळे शिरवळसह परिसरात खळबळ उडाली असून, खंडाळा तालुक्याचे सार्वजनिक जीवन गोळीबारासारख्या घटनांमुळे ढवळून निघाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील पळशी रोडवर जिल्हा परिषदेचे सदस्य उदय कबुले, गुलाब बरदाडे व कापूरहोळ येथील महेश गुरव यांचे पार्टनरशीपमध्ये मिरज वाईनशॉप नावाचे  देशी-विदेशी दारूचे दुकान आहे. उदय कबुले यांचा पुतण्या आकाश कबुले हा वाईनशॉप चालवतो. आकाश व  कामगाराने शुक्रवारी रात्री 10 वाजता एक शटर बंद केले. दुसरे शटर खाली घेऊन शिल्लक मालाची पडताळणी, हिशेब पूर्ण करून बाहेर आले. कामगार कुलूप लावत असताना पळशी बाजूकडून एका दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्‍ती तेथे आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्‍तीने आकाश कबुले यांच्या दिशेने गोळी झाडली. नेम चुकल्याने व गोळीच्या आवाजाने आकाश कबुले व कामगार सावध झाले. यावेळी गोळीबार करणारे दुचाकीवरून शिरवळ बाजूकडे पळून गेले. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अविनाश  पाटील, सपोनि सुनील धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, सागर अरगडे यांनी धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून पुंगळी हस्तगत केली. खंडाळा तालुक्यात गोळीबारा-सारख्या घटनेमुळे खळबळ उडाली असून खंडाळ्याचे सार्वजनिक जीवन कुठल्या दिशेने चालले आहे याबाबत सामान्य जनतेमध्ये चिंता व्यक्‍त होत आहे.