Sun, Jul 21, 2019 08:39होमपेज › Satara › अखेर अतिदुर्गम शाळेतून महिला शिक्षिकांची सुटका

अखेर अतिदुर्गम शाळेतून महिला शिक्षिकांची सुटका

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 8:34PMसातारा : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या  शाळांतून अखेर महिला शिक्षिकांची सुटका होणार आहे. दुर्गम, अतिदुर्गम आणि प्रतिकूल घोषित केलेल्या शाळांमध्ये शिक्षिकांना पदस्थापना देण्यात येवू नये, असा फतवा राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला आहे. तसेच सध्या दुर्गम क्षेत्रात कार्यरत शिक्षिकांना मे महिन्यात होणार्‍या बदलीस पात्र ठरवण्याचेही  आदेश जिल्हा परिषदांना देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेअंतर्गत असणार्‍या काही शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. काही शाळांच्या ठिकाणी  पोहोचण्यास पायी दोन दोन तास चालावे लागते. काही शाळांकडे जाताना जंगलातून व निर्जन ठिकाणावरून जावे लागते. काही शाळा ज्या ठिकाणी आहेत तेथील स्थानिक परिस्थितीमुळे शिक्षकांना मुक्काम करणेदेखील अडचणीचे होते. ही वस्तुस्थिती असली तरी अशा ठिकाणी पुरूष शिक्षकांबरोबर महिला शिक्षिकाही काम करत असतात.वास्तविक एवढ्या लांब पायी चालून या जंगलातून निर्जन ठिकाणावरून चालणे महिला शिक्षिकांसाठी अत्यंत अवघड आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षिकांच्या दुर्गम आणि महिलांना काम करण्यासाठी  प्रतिकूल परिस्थिती असणार्‍या  शाळांमध्ये पदस्थापना देवू नये, अशी अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. काही महिन्यापूर्वीच झालेल्या  बदल्यांमध्ये अनेक बाळंत आणि गरोदर माता शिक्षिकांना दुर्गम आणि  पायपीट करावी लागणार्‍या  शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली होती. अनेकदा निवेदने, आंदोलने करूनही त्यांना बदली मिळाली नाही.शिक्षिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता अखेर शासनाने दुर्गम शाळांमध्ये पदस्थापना न  देण्याचा निर्णय घेतला आहे.

जी शाळा प्रतिकूल म्हणून घोषित केली आहे, तेथे महिला शिक्षकांना बदली किंवा नियुक्ती दिली जाणार नाही. अशा शाळांवर कार्यरत महिला शिक्षिकांना येणार्‍या बदल्यामध्ये बदलीने सोप्या शाळेत जाता येणार आहे. सातारा जिल्ह्यात महिला प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.