Sat, May 25, 2019 22:40होमपेज › Satara › १०० चारा छावणी चालकांवर गुन्हे 

१०० चारा छावणी चालकांवर गुन्हे 

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 10:49PMसातारा : प्रतिनिधी

जिल्ह्यात सहा वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात पशुधन वाचवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. माण, खटाव आणि फलटण तालुक्यांतील 134 चारा छावणी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. महसूल विभागाने बुधवारपर्यंत 100 चारा छावणी चालकांवर गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली. नऊ चारा छावणी चालकांनी स्थगिती मिळवली असली, तरी उर्वरित 25 चारा छावणी चालकांवर कारवाई सुरू आहे. 

माण, खटाव, फलटण तालुक्यांतील जनावरांसाठी सहा वर्षांपूर्वी सरकारने चारा छावण्या सुरू केल्या. त्यावेळी शेतकर्‍यांची शेकडो जनावरे या छावण्यांमध्ये दाखल झाली. या जनावरांना पेंड, चारा आदी पुरवले जात होते. मात्र, जनावरांच्या बोगस नोंदी आणि चारा न वाटताच त्याचे अनुदान लाटण्याचा प्रकार वाढला. स्थानिक कर्मचार्‍यांना मॅनेज करून चारा छावणी चालकांनी चारा छावण्यांचा धंदा मांडला. त्यावेळी दै. ‘पुढारी’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून या प्रकाराला वाचा फोडली होती. ‘पुढारी’तील वृत्तांची गंभीर दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. एन. रामास्वामी यांनी त्यावेळी जिल्हा पुरवठा विभागाला चौकशीचे आदेश दिले.

डॉ. रामास्वामी यांनी दबावाला बळी न पडता कठोर कावाई सुरू केली. या चौकशीत बर्‍याच चारा छावणी चालकांचे गैरप्रकार उघडकीस आले. 134 जण या प्रकरणी दोषी आढळले. त्यामध्ये बड्यांची नावेही आहेत. त्यांच्याकडून 10 लाखांचा दंडही देय रक्‍कमेतून वसूल करण्यात आला. चारा छावणी चालकांमध्ये गावातील विविध कार्यकारी विकास सोसायट्यांची मोठी संख्या आहे. याप्रकरणी काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली. कोर्टाने विचारणा केल्यावर कावाईस राज्य शासनाही तयार असल्याचे सांगितले.

त्यानंतर संबंधित चारा छावणी चालकांभोवती शासनाने कावाईचा फास आवळला. गेली दोन दिवस ही कावाई सुरु आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत 100 चारा छावणी चालकांवर संबंधित मंडलाधिकार्‍यांनी ज्या-त्या पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल केले. 9 चारा छावणीचालकांनी या कारवाईवर स्थगिती मिळवली आहे. उर्वरित 25 चारा छावणी चालकांवर गुरुवारपर्यंत कारवाई होईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्‍त केली आहे. सातार्‍याबरोबरच सांगली, सोलापूर, बीड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील चारा छावण्यांचीही चौकशी सुरु असून गुन्हे दाखल केले जात आहेत.

फलटणमधील 18 छावणी चालक

फलटण तालुक्यात 2012-13 व 2013-14 या कालावधीमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी संस्था व सोसायटी यांच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, छावणी चालकांनी  यांनी छावणी करारनाम्यातील अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्या त्या वेळेस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यावर निर्णय झाला असून त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 18 छावणी चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फलटण तालुक्यातील अनेक राजकीय पदाधिकारी व प्रतिष्ठित व्यक्‍तींचा समावेश असल्याने फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.