Fri, Jul 19, 2019 20:24होमपेज › Satara › खंड्यासह बाळू खंदारेवर सावकारीचा गुन्हा

खंड्यासह बाळू खंदारेवर सावकारीचा गुन्हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

‘मोका’अंतर्गत अटकेत असलेल्या प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकरवर आणखी एक सावकारी, खंडणी, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात  सातारा नगरपालिकेतील नगरसेवक बाळू खंदारे याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. खंदारे याने चारभिंतीकडे नेऊन पिस्टल दाखवून पैसे न दिल्यास खलास करण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले असून, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

खंड्या नाना धाराशिवकर, शंकुतला बाळासाहेब धाराशिवकर, कुबड्या ऊर्फ अमित अशोक कुरणे, बाळू खंदारे, अमोल देशमुख, जमीर पठाण, अमीर शेख, योगेश लांडगे व अनोळखी 3 (सर्व रा. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बाजीराव शहाजी जगदाळे (वय 48, रा. आनंदनगर, संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार जगदाळे हे चालक असून त्यांची दोन वाहने आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 ऑगस्ट 2013 ते 25 नोव्हेबर 2017 या कालावधीत ही घटना घडली आहे. यातील तक्रारदार यांच्याकडे दोन टेम्पो असून ते कर्जाद्वारे हप्त्याने घेतले आहेत. कर्ज फेडण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने ते खंड्या धाराशिवकरला भेटले. सुमारे तीन टप्प्यात तक्रारदार यांनी खंड्याकडून 2 लाख रुपये 15 टक्के व्याजाने घेतले. सुरुवातीला ठरलेल्या व्याजाच्या रकमेप्रमाणे तक्रारदार खंड्याला पैसे देत होते. एक-दोनदा हप्‍ते देण्यास वेळ झाल्याने खंड्याने दंडासह हप्‍ते घेतले. अशाप्रकारे तक्रारदार यांनी व्याजापोटी घेतलेल्या 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात तब्बल 9 लाख 61 हजार रुपये दिले.

व्याजाने घेतलेले सर्व पैसे दिल्यानंतरही संशयित खंड्या धाराशिवकर हा त्याच्या टोळीबरोबर रात्री, अपरात्री घरात घुसून ‘राहिलेले पैसे दे’, असा तगादा लावायचा. यावेळी संशयित घरात नको त्या भाषेत बोलायचे. अखेर एकदा 1 लाख रुपये देण्यासाठी गेल्यानंतर खंड्याने त्यावेळी पैसे व दुचाकी जबरदस्तीने ठेवून घेतली. संशयितांनी जबरदस्तीने कारमध्ये घालून चारभिंती परिसरात नेले. त्यावेळी बाळू खंदारे याने त्याच्या कंबरेला खोचलेली बंदूक दाखवत पैसे न दिल्यास खलास करण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संशयितांकडून सावकारी प्रकरणात वारंवार त्रास होत असल्याने अखेर बाजीराव जगदाळे यांनी शनिवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

बाळू खंदारे दुसरा नगरसेवक...

सावकारी प्रकरणाने सातारा जिल्हा अक्षरश: हादरून गेला आहे. सर्वसामान्यांपासून शिक्षक, प्राध्यापक लोकांनाही खंड्याने सावकारी माध्यमातून पैसे दिले आहेत. व्याजाने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी खंड्याने टोळीच्या माध्यमातून अक्षरश: धुडगूस घातला आहे. सातारा शहराप्रमाणेच फलटण येथेही सावकारीने उच्छाद मांडला आहे. याच प्रकरणातून नगरसेवक सनी अहिवळे याच्यावरही गुन्हा दाखल झालेला असून, त्याला ‘मोका’ही लावण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सातार्‍यातील नगरसेवक बाळू खंदारे याच्यावरही सावकारीचा गुन्हा दाखल झाल्याने सावकारी प्रकरणात हा दुसरा नगरसेवक असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.